पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आहेत. देवलांचा काळ सोडा, पण आजही एकही मान्य शंकराचार्य समाजसुधारणेला आचार्यपीठाची मान्यता देण्यास तयार नाही. किरकोळ तपशिलांच्या बाजूवर डॉ. कुर्तकोटींनी सुधारणेची बाजू कधीकधी घेतलेली दिसते, पण सनातनधर्मीय हिंदू समाजाने डॉ. कुर्तकोटींना आपले जगद्गुरू म्हणून कधी मान्यता दिली नाही. आचार्यपीठांची ही रीत जर पाहिली तर धर्मसुधारणेविषयी प्रयत्न करणारा, चुकीच्या रूढी मोडून काढण्यासाठी बद्धपरिकर झालेला, सुधारणेच्या प्रचारासाठी शिष्य नेमणारा शंकराचार्य कधी वास्तवात आढळण्याची शक्यता नाही हे स्पष्ट होईल. देवलांना हे पात्र संपूर्णपणे स्वप्नरंजनातून उभे करावे लागले.
  नाटकाच्या शेवटी हे शंकराचार्य प्रत्यक्षतः उपस्थित होतात. त्यांच्यासमोर वाद होतो आणि त्यानंतर हे शंकराचार्य शारदा-कोदंडाच्या विवाहाला आशीर्वाद देऊन कोदंडाची बाजू पक्की करतात. कोदंडाच्या पाठीमागे शंकराचार्य उभे करून परंपरावादाची सोय झाली असेल, पण त्यामुळे वास्तववाद मावळला आणि आचार्यांचा हा विद्वान शिष्य शारदा-भुजंगनाथाचा विवाह अडवण्यासाठी काही बौद्धिक कामगिरी करतो म्हणावे तर तेही दिसत नाही. श्रींच्या आज्ञेने बाला-जरठ विवाह मोडला जात नाही, तो सगोत्र विवाह आहे या कारणावर मोडला जातो. श्रींच्यासमोर जो वाद होतो, त्यातही एक खोच आहे. ती ब्राह्मणांच्याशिवाय इतरांच्या लक्षात येणे कठीण आहे. श्रींच्यासमोर होणारा वाद बाला-जरठ विवाह करावा की करू नये या मुद्द्यावर होत नाही. स्त्री विवाहित केव्हा समजावी या मुद्द्यावर होतो. भुजंगनाथाबरोबर शारदेची सप्तपदी झालेली नाही, तेव्हा ती विवाहित नाही, हे सिद्ध करण्यासाठी महापंडितांनी कोणताच वाद करण्याची गरज नाही.

कोदंडाशी विवाह हाच शेवट ठरलेला
  कोदंडाशिवाय नाटक सुखान्त होत नाही, म्हणून आरंभापासून कोदंड आला. हा कोदंड उपरा वाटू नये म्हणून शारदेच्या विवाहाच्या कथानकात त्याचा सहभाग हवा. कोदंडाविषयी शारदेला सूक्ष्म अनुरक्ती हवी. तशी सूक्ष्म अनुरक्ती शारदेविषयी कोदंडाच्याही मनात हवी. ही सगळी काळजी घेत देवल निघालेले असल्यामुळे आत्महत्या करायला शारदा मोकळी नाही. खरे म्हणजे टीकाकार

२६/ रंगविमर्श