पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसते.
बाला-जरठ विवाह आणि विधवा विवाह.
 बाला-जरठ विवाहाचा प्रश्न विधवाविवाहाशी निगडित आहे ही जाणीव देवलांच्या पिढीला येणे शक्य नव्हते. सुटा-सुटा प्रश्न विचारात घेणाऱ्या मंडळींना बालविवाह, विधवाविवाह आणि बाला-जरठ विवाह असा संयुक्त विचार करणे शक्य नव्हते. म्हणून सुखी शेवट करण्यासाठी भुजंगनाथाशी लग्न होऊन चालणार नव्हते. ते लग्न ठरणे आणि मोडणे या घटना आवश्यक होत्या; पण भुजंगनाथाचा शारदेबरोबरचा विवाह मोडायचा कसा? हा विवाह मोडण्यासाठी परंपरावादी मनाला दुखावेल असा कोणताही मार्ग देवल स्वीकारण्यास तयार नव्हते, कारण त्यांचे स्वतःचे मनच परंपरावादी होते. परंपरावादाच्या कक्षेत राहून भुजंगनाथाचा विवाह मोडायचा असेल, तर काही पर्याय डोळ्यांसमोर होते. एक पर्याय भुजंगनाथच्या अपमृत्यूचा आहे; पण त्यामुळे कांचनभटाने शारदा दुसऱ्या म्हाताऱ्याला देऊ केली असती. हा कांचनभट वाटेतून बाजूला सारण्यासाठी देवलांनी त्याला शेवटी वेडा करून टाकला आहे आणि तो वेडा होण्याइतपत धक्का बसावा यासाठी ऐन समारंभात विवाह मोडून दाखविला आहे. एक पर्याय शेवटच्या क्षणी भुजंगनाथाला विरक्ती निर्माण होण्याचा असा होता; पण या पर्यायात प्रेक्षकांची सहानुभूती भुजंगनाथाकडे जाते. हे घडून येणे देवलांना इष्ट नव्हते. भुजंगनाथ आजारी पडल्यामुळे असो किंवा इतर कोणत्याही कारणामुळे असो, एकदा शारदेचा पिता वाचादत्त झाला की वाचादत्त पित्याने लग्न मोडणे परंपरावादाला मंजूर नव्हते. म्हणून देवलांनी तो विवाहच अशा बेताने घडवून आणला आहे की, तो आरंभापासून शेवटपर्यंत निर्विवादपणे धर्मशास्त्रविरोधी असला पाहिजे. देवलांच्या परंपरावादी मनाला धर्मशास्त्रात आधार नसणाऱ्या मुद्द्यावर विवाह मोडणे आवडले नसते.
रूढी चूक, शास्त्र बरोबर
 आमचे आद्य समाजसुधारक (म. फुले व आगरकर वगळता) हिंदूंचे परंपरागत धर्मशास्त्र गुंडाळून ठेवण्यास तयार नव्हते. स्मृतींचा पुनर्विवाहाला पाठिंबा आहे म्हणून पुनर्विवाह शास्त्रविहित आहे, असे सिद्ध करण्यावर या

देवलांची शारदा / २३