पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

याचे उत्तर निर्णायकपणे देवलच देऊ शकले असते. नाट्यरचनेच्या अभ्यासावरून आपण इतकेच म्हणू शकतो की, आरंभापासून देवलांची इच्छा सुखान्त नाटक लिहिण्याची होती. त्या दृष्टीने त्यांनी आपल्या नाटकाचे आरंभ-मध्य-शेवटासह विकल्पन केले आहे, नाटकातील बारीकसारीक दुवासुद्धा सुखी शेवटाच्या दृष्टीने या नाटकात आलेला आहे. जर या नाटकाची रचनाच सुखान्तिकेची असेल, तर मग शारदेने जीव देण्याच्या ठिकाणी नाटक संपावे ही गोष्ट शक्यच नव्हती.
 हे नाटक सुखान्त करण्याचा निर्णय देवलांनी प्रथम घेतला. ही आयत्या वेळी मनात आलेली कल्पना नव्हती. आरंभापासूनच नाटकाशी एकजीव झालेली ही कल्पना होती. देवलांच्या नाटकातील पदे पुष्कळदा संपूर्ण नाटकाची रचना होण्यापूर्वी तयार होत असत. या दृष्टीने पाहिले तर देवलांच्या मनात कुठेतरी एक झगडा चालू असल्याचे दिसते. त्यांनी वराचे वय पन्नाशीच्या जवळपास आरंभाला गृहित धरले असल्याचे दिसते. त्या अनुरोधानेच ‘पन्नाशीची झुळुक लागली, बाइल दुसरी करू नको' हा उल्लेख आलेला आहे; पण पुढे नाटक सुखान्त करायचे ठरल्यानंतर नवरदेव पन्नास वर्षांचा असण्याची गरज उरली नाही. त्यांनी तो पंचाहत्तर वर्षांचा ठरवलेला आहे. जोडीला जोड म्हणन सदाम-सावकार सत्तर वर्षांचा गृहित धरला आहे. एक विवाह नाटकाच्या आरंभी घडलेला आहे. दुसरा नाटकात घडू घातलेला आहे. दोन्ही ठिकाणी देवलांनी नवरदेव अतिवृद्ध गृहित धरले आहेत याला कारण आहे. एकदा नाटक सुखान्त करायचे म्हटल्यानंतर देवलांना दोन गोष्टींची काळजी घेणे भाग होते. एकतर नायिकेला अनुरूप असा वर शोधून देण्याची जबाबदारी देवलांनी पार पाडणे भाग होते. सुखान्त नाटकाचा शेवट अनुरूप वराशी शारदेचा विवाह घडवून दिल्याशिवाय दुसरा कोणता कल्पिणे शक्य नव्हते. यासाठी कोदंड या पात्राची निर्मिती करणे आवश्यक होते. शेवटी शारदेचे जर कोदंडाशी लग्न लावायचे असेल, तर तिचे लग्न भुजंगनाथाशी होऊ देणे शक्य नव्हते. एकदा भुजंगनाथाचे आणि शारदेचे विधिवत .लग्न झाले की, त्यानंतर सुखी शेवट होण्यासाठी भुजंगनाथ मरेपर्यंत वाट पाहणे व नंतर शारदेचा पुनर्विवाह लावून देणे अशी रचना करावी लागली असती. ही रचना झाल्यानंतर ते नाटक पुनर्विवाहावरील नाटक झाले असते. बाला-जरठ विवाहावरचे नाटक उरले

२२ / रंगविमर्श