जरठाशी लग्न होणे ही सामाजिक समस्या आहे. लग्न ठरणे ही सामाजिक समस्या नाही. जर एकेका मुलीचे भुजंगनाथासारख्या वृद्ध कपीशी लग्न ठरून मोडत असते व शेवटी या मुलींना कोदंडासारखा अनुरूप वर मिळत असता, तर मग समस्या शिल्लकच राहिली नसती. बाला-जरठ विवाहाचे दुष्परिणाम दाखविण्यासाठी लिहिले जाणारे नाटक जरठाला विवाहाची इच्छा निर्माण होते इथून आरंभ पावू शकत नाही. समस्याप्रधान नाटकात निदान समस्या उपस्थित झाली पाहिजे. भुजंगनाथ आणि शारदा विवाहानंतर गंगापूरहून आपल्या गावी परत येतात व शारदेचा दुःखद संसार सुरू होतो, इथून समस्याप्रधान नाटकाचा आरंभ झाला पाहिजे. सर्व नाटकभर शारदेचा दारुण कोंडमारा प्रामुख्याने दाखवला जायला पाहिजे. परिणामी शारदा स्वैरिणी झाली असती अगर तिने आत्महत्या केली असती आणि याहीपेक्षा मोठ्या शक्तीचा नाटककार असता, तर त्याने उत्साहशून्य जीवन्मृत सौभाग्य आणि तितकेच मृतवत वैधव्य शारदा भोगीत बसली हीच बाब तिच्या मृत्यूपेक्षा अधिक भीषण करून दाखवली असती. पण अशा प्रकारचे नाटक लिहिण्याची देवलांची इच्छा नव्हती. शोकान्त नाटकाचा पुरेसा वाईट अनुभव देवलांनी घेतलेला होता. त्याची पुन्हा परीक्षा पाहण्याची देवलांची इच्छा नव्हती.
सुखान्त नाटक हा हेतू.
बाला-जरठ विवाहावर नाटक लिहायचे हा देवलांचा पहिला हेतू होता. हे नाटक सुखान्त करायचे हा देवलांचा दुसरा हेतू होता. उद्बोधनासाठी ललित वाङ्मयाची निर्मिती करू इच्छिणाऱ्या लेखकांच्यासमोर एक प्रश्न नेहमी उभा असतो : आपण जे लिहितो आहोत ते जर उद्बोधनाचे साधन म्हणून उपयोगी पडायचे असेल तर रसिकांना प्रिय झालेच पाहिजे, ही त्यासाठी आवश्यक अट आहे. जे कुणीही वाचणारच नाही, जे कुणाला वाचवणार नाही अशा लिखाणाची किंमत प्रचाराचे साधन म्हणूनही शून्य असते. उद्बोधनासाठी लिहिणारे कलावंत मधून मधून रंजनाच्या सूत्रांशी तडजोड करीत बसतात असे जे आपल्याला दिसते, त्याचे कारण या ठिकाणी सापडते. उद्बोधनाच्या तीव्र जिज्ञासेपोटी देवलांनी वास्तविक जीवनदर्शनाशी तडजोडी केल्या असे म्हणावे की त्यांना मुळात शोकान्त नाटकाचा पुन्हा प्रयोग करण्याची इच्छा नव्हती असे म्हणावे,
पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/22
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
देवलांची शारदा/२१