पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/20

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करील अशी देखणी बायको पाहिजे हे म्हणणारा भुजंगनाथ विषम-विवाहातल्या वरांचा प्रतिनिधी नसतो. अम्लान, ताज्या सौंदर्याचा नित्य उपभोग घेण्यास वखवखलेला असा तो मध्ययुगीन बादशहा वाटतो. ज्या प्रमाणात असे वाटत जाईल, त्या प्रमाणात या नाटकातील समाजदर्शनाची वास्तवता मावळत जाणार आहे. नाटकाच्या प्रस्तावनेतच नटीच्या तोंडून देवलांनी सुदाम-सावकाराची वधू दहा वर्षांची आहे असा उल्लेख केला आहे. सत्तराव्या वर्षी लग्न करणारा माणूस विवाहसौख्यासाठी अजून चार वर्षे वाट पाहण्याइतका बिनघोर मनाचा नसतो, हे कुणाच्याही लक्षात येऊ शकेल.
 जाणूनबुजून म्हाताऱ्याच्या गळ्यात आपली मुलगी बांधणारा वधूपिता हाही आपण समजून घेतला पाहिजे. त्याच्याजवळ अपत्यविषयक ममता नसते असे समजण्याचे काहीच कारण नाही. बिजवराला मुलगी देणारा बाप हा दारिद्र्य आणि कर्जबाजारीपणा यांमुळे खंगलेला व पराभूत झालेला बाप असतो. तोही मनातून ओशाळलेलाच असतो. आपल्या एका अपत्याचे बिजवराशी लग्न लावून तो सधनाच्या शेल्याला आपली गाठ बांधू पाहात असतो. यामुळे उरलेल्या मुलाबाळांचे योगक्षेम नीट चालतील, मुलांच्या शिकण्याची सोय होईल, उरलेल्या मुलींच्या लग्नांची सोय होईल, आपल्या संसाराला मोठ्यांचा आधार लागून तो काही प्रमाणात वाटेवर येईल या भूमिकेतून आपल्या एका अपत्याचे काहीसे अकल्याण करण्यास तयार झालेला लाचार माणूस हा विषम-विवाहातील वधूपिता असतो. स्वतःच्या मुलांची माया आणि संसाराची चिंता त्याला हे पाऊल उचलण्यात भाग पाडीत असते.
 आणि तरीही हा वधूपिता आपल्या मनाच्या समाधानासाठी काही गोष्टी सतत बोलतच असतो. वराचे वय थोडे मोठे असले तरी हरकत नाही; तो शरीराने धडधाकट आहे- गेला बाजार, अजून देवाची दया असली तर पंधरा-वीस वर्षे नवरदेव हिंडता, फिरता, कमावता असायला घोर नाही; मुलीला चार पोरे-बाळे होतील; पोरगी मोठ्या घरी पडेल- अशा प्रकारची स्वप्ने बोलून दाखविणारा, दारिद्र्यामुळे दुबळा आणि वात्सल्यापोटी निष्ठुर झालेला असा हा वधूपिता असतो. पैशाच्या दोन घागरी घरी पुरून ठेवणारा, पाच हजार रुपये हुंडा घेणारा व एकुलती एक मुलगी केवळ द्रव्यलोभामुळे म्हाताऱ्यास विकायला तयार झालेला कंजूष, द्रव्यलोभी कांचनभट हा विषम-विवाहातल्या वधूपित्यांचा

देवलांची शारदा / १९