पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/19

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

समाजात पुनर्विवाह सार्वत्रिक झाल्यानंतर विषम-विवाह हा सामाजिक प्रश्न नसतो. बाला-जरठ विवाहावर नाटक लिहिणाऱ्या नाटककाराची भूमिका जर एका बाजूने बालविवाहाला प्रतिकूल आणि दुसऱ्या बाजूने विधवाविवाहाला अनुकूल नसली, तर मग त्या लेखकाचे लिखाण वास्तवाचे भान सुटणारे होणे अपरिहार्य असते.
 'शारदा' नाटकात विधवाविवाहाला अनुकूलता अगर प्रतिकूलता दाखवण्याची वेळ आलेली नाही, पण देवलांनी स्पष्टपणे बालविवाहांना अनुकूलता मात्र दाखवलेली आहे. शारदेच्या सगळ्या मैत्रिणींची लग्ने लहान वयांत झाली आहेत. कारण त्यांचे बाप मुलीची चिंता करणारे प्रेमळ बाप आहेत. शारदेचे लग्न लहान वयात झाले नाही, कारण तिचा बाप द्रव्यलोभी आहे. म्हणून तर आपले लग्न कधी होईल अशी चिंता करण्याची वेळ शारदेवर आलेली आहे. 'शारदा' नाटकातील संदर्भ ऋतुप्राप्तीपूर्वीच्या बालविवाहांना अनुकूल आहेत हे केवळ त्या काळच्या परिस्थितीचे चित्रण नव्हे. ती देवलांच्याही मनाची स्वाभाविक घडण आहे.बालविवाह नसावेत असे आग्रहाने प्रतिपादन करणाऱ्या देवलांच्या समकालीनांना बारा वर्षांखालील मुलीचा विवाह होऊ नये इतकेच म्हणायचे होते. बाराव्या-तेराव्या वर्षी मुलगी विवाहाला योग्य होते असे हे सुधारकसुद्धा मानीत होते.
 विषम-विवाहातील वर हाही आपल्या भोवताच्या सामाजिक परिस्थितीचे भक्ष्य असतो. आपल्या मुलीच्या वयाच्या एका अर्भकाशी लग्न करताना तोही मनातून ओशाळून जात असावा. स्वतःच्या प्रकृतिधर्मासमोर आणि परिस्थितीसमोर हा वरही लाचार झालेला असतो. या वराला लहान, सुबक, ठेंगणी पत्नी नको असते. तो सौंदर्याची फारशी चिकित्सा करीत नाही. त्याला शक्य तितकी मोठी दिसणारी, थोराड अंगापिंडाची आणि विवाहानंतर शक्यतो लवकर वयात येणारी गृहिणी हवी असते. रूप-सौंदर्याकडे काणाडोळा करण्यास हा वर तयार असतो. वधूपित्याचे घराणे आपल्या बरोबरीचे आहे की नाही याची चौकशी करण्यास त्याला वेळ नसतो. प्रथम विवाहाच्या वेळी रूप, हुंडा, कुलीनपणा या बाबींना त्या काळी फार मोठे महत्त्व असे. बिजवराच्या लग्नात या बाबी गौण असतात. त्या ठिकाणी शक्यतो लवकर ‘संसाराला लागणारी मुलगी' एवढा एकच प्रश्न महत्त्वाचा असतो. सत्तर वर्षांच्या सुदाम-सावकारावर ताण

१८ / रंगविमर्श