पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/18

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

विषम-विवाहातील नवरदेव हा सामान्य नियम म्हणून पस्तीस ते चाळीस या वयातील सापत्य विधुर असे किंवा चाळीस ते पंचेचाळीस या वयातील विनापत्य विधुर असे. सर्वसामान्य परिस्थितीत चाळिशीत विधुर होणाऱ्या पुरुषासमोर पहिला प्रश्न स्वतःच्या मुलीच्या लग्नाचा असे. तो स्वतःच्या लग्नाच्या भानगडीत पडत नसे.

विषमविवाह
 या सामान्य नियमाला अपवाद होतेच. पण अपवाद हे अपवाद म्हणून असतात. सार्वत्रिक नियम म्हणून त्यांचा विचार करता येत नाही. पंचाहत्तर वर्षांच्या भुजंगनाथाचे लग्न चौदा वर्षांच्या शारदेशी ठरवले जावे ही घटना घृणा निर्माण करणारी व अंगावर शहारे आणणारी असली तरीही प्रातिनिधिक घटना नाही. अपवादात्मक घटना कलाकृतींना वर्ण्य नसतात. अपवादात्मक घटनांच्यावर श्रेष्ठ कलाकृतीची उभारणी झाल्याचे उदाहरण आपण कधीच विसरू शकत नाही. कारण शेक्सपिअरचे ‘हॅम्लेट' असे नाटक आहे; पण अपवादभूत घटना सामाजिक समस्येच्या वास्तववादी चित्रणाला निरुपयोगी असतात.
 एका बाजूने हा प्रश्न बालविवाहाशी निगडित आहे. आज लग्नाच्या बाजारात सोळा ते चाळीसपर्यंतच्या कोणत्याही वयातील कुमारिका विवाहासाठी उपलब्ध आहेत. ज्या समाजात प्रौढ कुमारिका उपलब्ध असतात, त्या समाजात विषम-विवाह हा सामाजिक प्रश्न नसतो. ज्या समाजात बालविवाह सार्वत्रिक असतो, त्या ठिकाणी विषम-विवाहाला उत्तर नसते. देवल समाजसुधारणेच्या युगात होते म्हणून त्यांना काही गोष्टी जाणवल्या. कालिदासाला त्या जाणवणे शक्य नव्हते. 'मालविकाग्निमित्र' लिहिताना आपण प्रेमकथेला विषम-विवाहाचे अधिष्ठान निष्कारण देतो आहोत असे कालिदासाला वाटले नाही. उलट त्याला मालविकेचे अग्निमित्राशी लग्न ही घटना इष्ट आणि आनंददायक वाटली. दुसऱ्या बाजूने हा प्रश्न विधवाविवाहाशी निगडित आहे. बालविवाह बालविधवा निर्माण करतो. शिवाय विवाहपद्धती ज्या समाजात रूढ आहे, त्या समाजात विधवा आणि परित्यक्ता असतातच. जर समाजात विधवाविवाह रूढ असले तर मग लग्नासाठी विधुरांना विविध वयांच्या वधू उपलब्ध असतात. अशा

रं....२
देवलांची शारदा / १७