पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/14

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सोडाच, पण नव्याने पुढे येणाऱ्या खाडिलकर-कोल्हटकरांची प्रतिष्ठा व लोकप्रियताही त्या कालखंडात देवलांना मिळाली नाही.
 एकदम डोळे दिपवणारी अशी देवलांची नाट्यसृष्टी नाही. ती क्रमाने अंतःकरण काबीज करून मनात रुजणारी व अढळ राहणारी अशी पण प्रकृतीने सौम्य अशी नाट्यसृष्टी आहे. कोल्हटकरांप्रमाणे देवल चटकन स्वतःकडे आकर्षित करून घेणाऱ्या नावीन्याने नटलेले नव्हते. आणि नावीन्य ओसरल्यानंतर कोल्हटकरांच्याप्रमाणे प्रायोगिक रंगभूमीवरून त्यांचा अस्तही झाला नाही. या कालखंडात देवल स्फुट गद्य लिखाणही करीत होते. त्याना मराठीत भाषांतरासाठी निवडलेली कादंबरी रेनाल्ड्सची होती. त्यांना संस्कृतमध्ये आकर्षण वाटले असेल, तर ते कालिदास, शूद्रक आणि बाणभट्टाचे होते. यांत शूद्रकालाच काही प्रमाणात आपण वास्तववादी नाटककार म्हणू शकतो. त्या वास्तववादाच्या खाणाखुणा देवलांच्या अनुवादात पुसट झालेल्या आहेत.

शारदा : सामाजिक आशय असणारे पहिले नाटक
 मराठीतील सामाजिक नाटकांचे प्रणेते म्हणून देवलांना ओळखले जाते ते 'शारदा'मुळे. 'शारदा' हे प्रभावी ठरलेले व सामाजिक आशय असणारे मराठी रंगभूमीवरील पहिलेच नाटक होते आणि देवलांचेही पहिलेच स्वतंत्र वाङ्मयीन अपत्य तेच होते. याचा अर्थ यापूर्वी हा प्रयोग कुणी केला नव्हता असा मात्र करता येणार नाही. 'शारदा'पूर्वी सामाजिक समस्यांना कोल्हटकरांनी हात घातलेला होता. 'शारदा' नाटकापूर्वी तीस-चाळीस वर्षे सुधारकांच्या विवेचनांनी आणि भूमिकांनी महाराष्ट्रीय वातावरण दुमदुमले होते. आगरकर 'शारदा' पूर्वीच वारलेले होते. न्या. रानडे व डॉ. भांडारकर यांचे कार्य 'शारदा पूर्वी बरेच वाढलेले होते. 'शारदा' नाटकापूर्वी आठ वर्षे संमति-वयाचा कायदा मुंबई प्रांताच्या विधानसभेसमोर आलेला होता. विष्णू पंडितांनी पहिला विधवाविवाह यापूर्वीच घडवलेला होता. या सगळ्या समाजसुधारकांच्या यादीत म. फुले यांचे नाव मी मुद्दामच वगळलेले आहे. मराठी वाङ्मयाच्या पहिल्या अवस्थेच्या संदर्भात विचार करायचा तर आमच्या प्रतिष्ठित लेखकांना ज्योतिबा फुले यांचे कार्य आकलन झालेले तर दिसतच नाही, पण जाणवल्यासारखेसुद्धा वाटत नाही. या

देवलांची शारदा/ १३