पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/12

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

देवल या तिघांनाही समान आहे.

आशयाचा वास्तववाद
 पण वास्तववादी नाटक अनलंकृत भाषाशैलीमुळे किंवा प्रासादिक भाषेमुळे वास्तववादी होत नाही. ते समस्येच्या खरेपणामुळे वास्तववादी होत नाही. खऱ्या वास्तववादी नाटकाला वास्तववादी जीवनदर्शन लागते. म्हणजे आशयाचा वास्तववाद लागतो. हा वास्तववाद देवलांच्या नाटकांत आहे काय? हे तपासून पाहण्याची गरज आहे. ज्या कालखंडाच्या चौकटीत देवल निर्माण झाले त्या चौकटीत जर आपण पाहिले, तर देवलांचे दोष फारसे जाणवणार नाहीत, संवादांचा स्वाभाविकपणा सोडला तर नाट्यरचनेचे उरलेले सर्व दोष खाडिलकर, गडकरी आणि देवल यांना समान आहेत. हे मान्य केल्यामुळे आपण देवलांचा फार मोठा अपमान करत आहो असेही वाटण्याची गरज नाही किंवा कलावंत म्हणून देवलांनी जे मोठेपण हक्काने मिळविलेले आहे त्यालाही बाधा येण्याचे कारण नाही. यशस्वी नाटककार समस्याप्रधान वास्तववादी नाटक लिहिणारा असलाच पाहिजे असा एकांगी आग्रह धरण्याचे कुणालाच काही कारण नाही.

यशापयश
 नाट्याच्या क्षेत्रातील देवलांचा प्रवास हा फारसा सुखद असा कधीच नव्हता. देवल अतिशय चांगले तालीममास्तर होते. ते नाट्यप्रयोग फार चांगला बसवून घेत अशी त्यांची ख्याती आहे; पण नाट्यरचेनवर मात्र दीर्घकाळ त्यांना प्रभुत्व मिळवता आलेले दिसत नाही. त्यांनी लिहिलेले पहिले नाटक 'दुर्गा' हे अनुवादित आणि शोकान्त होते. हे नाटक रंगभूमीवर फारसे प्रभावी ठरले नाही. मराठी रंगभूमीवर शोकान्त नाटके आरंभापासून अधूनमधून येत राहिली, पण शोकान्त नाटके प्रेक्षकांच्या मनाची पकड दीर्घकाळपर्यंत घेऊ शकली नाहीत. शोकान्तिकेला मराठी रंगभूमीवर प्रतिष्ठा व लोकप्रियता मिळवून देणारे नाटककार म्हणून अग्रक्रमाने गडकऱ्यांचा उल्लेख करावा लागेल. कालक्रमाच्या दृष्टीने पाहिले, तर याबाबतचे काही श्रेय खाडिलकरांनाही द्यायला हवे. नंतर देवलांनी लिहिलेले 'विक्रमोर्वशीय' हेही अनुवादित नाटक फारसे प्रभावी ठरले नाही. 'मृच्छकटिक', 'झुंजारराव' व 'फाल्गुनराव' अर्थात 'तसबिरीचा घोटाळा'

देवलांची शारदा/ ११