पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

मराठी रंगभूमीच्या ज्या परिस्थितीच्या चौकटीत देवल निर्माण झाले ती चौकट विसरून जाऊन देवलांचा विचार करण्याची प्रवृत्ती अलीकडे बलवान होऊ लागली आहे. एखाद्या कलावंताचे कलात्मक मोठेपण परिस्थितीच्या चौकटीवर अवलंबून असते असे कुणीच म्हणणार नाही. कलाकृतींचा दर्जा परिस्थितिसापेक्ष नसतो. हे मान्य केले तरी कलाकृतीचे आकलन मात्र मोठ्या प्रमाणात परिस्थितिसापेक्ष करणेच भाग असते आणि कित्येकदा हे आकलन मूल्यमापनाकडे जाण्याच्या काही दिशाही दाखवून देते. ज्या वेळी कोल्हटकर, गडकरी आणि खाडिलकर यांचा अधिक्षेप करण्यासाठी देवलांचा अधूनमधून उल्लेख केला जातो, त्या वेळी मराठी रंगभूमीच्या ज्या अवस्थेत हे नाटककार उदयाला आले ती चौकटच विसरली जाते, असे मला वाटते.
 विशेषतः खाडिलकरांच्या नाटकांतील ओजस्वी वाक्यांचा खणखणाट आणि गडकऱ्यांच्या नाटकांतील कृत्रिम, काव्यमय भाषेने व्यापलेले व्याख्यानवजा संवाद यांचा विचार केला जातो, त्या वेळी हे जास्तच लक्षात येते. खाडिलकर आणि गडकरी यांच्या नाटकांमध्ये दोष नाहीत अगर त्यांना मर्यादा नाहीत असे नाही. उलट या मंडळींचे दोष स्वतःकडे हमखास लक्ष वेधून घेतील इतके ठळक आहेत; पण या दोघांच्यापेक्षा देवलांची नाटकेही फारशी निराळी नाहीत. ज्या कारणांसाठी खाडिलकर-गडकऱ्यांना दोष दिला जातो त्यापासून शारदा नाटकही फारसे अलिप्त नाही. शारदा हे नाटक वास्तववादी म्हणत असताना आपल्याला नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हेच एकदा निश्चित करून घेतले पाहिजे. वास्तववाद हा शब्द जर आपण शैलीपुरता विचारात घेणार असू, तर मग किर्लोस्करांच्या इतकीच देवलांची शैली वास्तववादी आहे असे म्हणावे लागेल; किंबहुना किर्लोस्करांच्या वास्तववादाचा वारसा देवल चालवीत आहेत असेही म्हणता येईल. भाषाशैलीचा प्रश्न बाजूला ठेवून आपण समाजातील खऱ्याखुऱ्या समस्यांकडे वळलो, तर सगळ्याच नाटककारांच्यासमोर असणाऱ्या समस्या खऱ्याच होत्या असे आढळून येईल. कोल्हटकरांनी मद्यपान, पुनर्विवाह यांसारख्या समस्या आपल्या नाटकांमधून विचारात घेतलेल्या आहेत. खाडिलकरांनी राजकीय पारतंत्र्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न केला आहे. समस्या म्हणून पाहिले तर सगळ्याच समस्या वास्तव असतातच. समस्येचा वास्तवपणा हा कोल्हटकर, खाडिलकर आणि

१० / रंगविमर्श