पान:रंगविमर्श (Rangavimarsh).pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

प्रकरण: १


देवलांची शारदा



 गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म इ. स. १८५५ साली झाला. त्यानुसार त्यांची जन्मशताब्दी इ. स. १९५५ ला मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला हवी होती, पण ती झाली नाही. देवल १९१६ ला वारले. यानुसार त्यांची पन्नासावी पुण्यतिथी पुढच्या वर्षी येते. कृतज्ञता म्हणून ही पुण्यतिथी आपण कै. देवलांच्या नाट्यसेवेच्या फेर मूल्यमापनासह साजरी केली पाहिजे. मराठी रंगभूमी आणि मराठी नाटके या क्षेत्रांत किर्लोस्कर आणि देवल ही गुरुशिष्यांची जोडी अशी आहे की, ज्यांच्या वाङ्मयीन मोठेपणाबद्दल फारसे दुमत कधीच झाले नाही. कोल्हटकर आणि गडकरी या दुसऱ्या गुरुशिष्यांच्या जोडीबद्दल जेवढी विवाद्यता राहिली, तेवढी सर्वमान्यता पहिल्या जोडीविषयी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या पूर्वी मराठी रंगभूमीवरील सर्वांत महत्त्वाचे नाटककार म्हणून जर आपण यादी करू लागलो, तर कुणीही देवलांचे नाव विसरण्याचा संभव नाही. देवलांच्या वाङ्मयीन मोठेपणाविषयी कधीच कुणाची तक्रार नव्हती. या सर्वमान्यतेमुळेच की काय त्यांच्या वाङ्मयाचा तपशीलवार चिकित्सक अभ्यास करण्याचा फारसा प्रयत्नही झाला नाही. देवलांचे मोठेपण मान्य केले तरी त्या मोठेपणाचे स्वरूप कोणते याविषयी मात्र दुमत होण्याचा संभव आहे.
 'शारदा'कार देवल पिंडप्रकृतीने वास्तववादी नाटककार होते हे एकदा सर्वांनी गृहित धरले आणि त्यांच्या प्रासादिक मराठीतील अकृत्रिम संवादकौशल्याची स्तुती करून बहुतेक टीकाकार थांबले. यापेक्षा खोलात जाण्याचा फारसा प्रयत्न करण्याची गरज कुणाला भासली नाही. रसिकतेच्या निकोप वाढीसाठी अशा प्रयत्नांची आवश्यकता आहे असे मला वाटते. विशेषतः

देवलांची शारदा/ ९