पान:युगान्त (Yugant).pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६६ / युगान्त

व्यापारांपासून बचावली नाहीत. ह्या सर्वांशी विरोधाने विदुराचे आयुष्य एक प्रकारे उठून दिसते; एक प्रकारे अजिबात विसरले जाते. तो दासीपुत्र म्हणून जन्माला आला व राज्याला मुकला. अगदी लहान वयातच त्याने आपले वैफल्य गिळून आयुष्याचा एक विशेष मार्ग आखला की काय, असे वाटते. महाभारतामध्ये एरवी सगळ्यांच्या पोटातील विचारांना वाचा फोडलेली आहे, पण विदुराच्या बाबतीत मात्र महाभारत काहीच सांगत नाही. का तो खरोखरच विदुर आणि ज्ञानी होता ? का प्रत्यक्ष यमधर्माचा अवतार होता, म्हणून आयुष्याची खळबळ त्याला शिवलीच नाही ? तो सर्वस्वी उदासीन होता, असेही म्हणता येत नाही. तो पांडवांचा कैवारी होता. क्रौर्याचा व अन्यायाचा त्याला तिटकारा होता. पण त्याने आपले स्थान सोडले नाही. लढाईच्या दिवशी दोन्ही सैन्ये एकमेकांसमोर उभी असताना युयुत्सू उघडपणे जाऊन पांडवांना मिळाला. पांडवांना न्याय देण्याबद्दल धृतराष्ट्राशी सारखी कटकट करूनही विदुराने धृतराष्ट्राला सोडले नाही. धृतराष्ट्राची निर्भत्सनाही त्याने केली व धृतराष्ट्रावर प्रसंग ओढवला, तेव्हा त्याचे सांत्वनही त्यानेच केले.
 धृतराष्ट्र आणि पांडू यांचे जसे लहानपणी भीष्माने पालनपोषण केले तसेच विदुराचेही केले. विदुर हा मोठेपणी विदुरत्व पावला होता. सभांमध्ये, विशेषतः द्रौपदीहरणाच्या व कृष्णशिष्टाईच्यावेळी विदुराची व त्याचप्रमाणे भीष्माचीही भाषणे दिली आहेत. पण त्या दोघांचे एकमेकांशी संभाषण किंवा विचारविनिमय झालेला दिसत नाही. संभाषणाचा जो एक प्रसंग आदिपर्वाच्या १०३ या अध्यायात दिला आहे, तो उघड-उघड प्रक्षिप्त वाटतो. तो भाग असा : भीष्म विदुराला म्हणतो आहे, "सुबलाची मुलगी (गांधारी), मद्राची राजकन्या ( माद्री) व यादवी (कुंती) अशा मुली आपल्याकडे सुना म्हणून आणाव्या, असे मला वाटते आहे. विदुरा, तुझे म्हणणे काय आहे?" विदुर म्हणतो