पान:युगान्त (Yugant).pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ६५

पांडव द्यूत हरले, त्या वेळी एखाद्या लहान मुलासारखा विजयाने नाचलास. मी सांगत होतो की, "बाबा ! हा विजय नाही, हा सत्यानाश आहे. तेव्हा तू ऐकले नाहीस. आता क्षत्रियासारखा वाग. शोक करू नकोस." ह्या शब्दांत हिणवण्याचा प्रयत्न दिसत नाही. जे आपण भोगतो, ते आपल्या कर्माचे फळ असते. तेव्हा आता ते धीराने भोगावे, असाच त्याचा सूर होता.
 विदुर स्वतःला काही मिळाले नाही, म्हणून कधी दुःख करताना दिसत नाही. तसा विचार केला, तर महाभारतातल्या इतर व्यक्तींच्या मानाने त्याचे आयुष्य सुखाचेच गेले. त्याचे लग्न झाले होते. तो स्वतःच्या घरी मनन, चिंतन, पूजन करीत राहिला होता. त्याला मुलेबाळे झाली होती. ज्ञानी म्हणून त्याचा लौकिक होता. पण तरीही त्याचे सर्व आयुष्य एक प्रकारे उदास व विषण्ण वाटते. महाभारतातील प्रत्येक व्यक्ती-पुरुष असो, स्त्री असो, उच्च असो, नीच असो, कोठच्या-ना-कोठच्या तरी उलाढालीत गुंतलेली आढळते. धृतराष्ट्र आणि पांडू, गांधारी आणि कुंती, दुर्योधन व पांडव, द्रौपदी, सुभद्रा, उत्तर-उत्तरा व त्यांचे मुलगे आणि श्रीकृष्ण व इतर यादव ही मंडळी फार खळबळीचे व उत्कट असे जीवन जगत होती. त्यात चढ होते, उतार होते, प्रेम होते, द्वेष होता, आणि जी काही शांती होती, ती मरणानंतरही किंवा आयुष्याच्या शेवटी जाणून-बुजून मोठ्या प्रयासाने जीवनाचे आघात सहन करून दमल्यानंतर मिळवलेली. ही शांती खरी शांती वाटत नाही. त्यातही एक प्रकारचा अट्टाहास वाटतो. धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती ह्यांचा वनवास किंवा पांडव आणि द्रौपदी यांचे महाप्रस्थान हे शांतिदायक किंवा शांतिकारकही वाटत नाही. जी गोष्ट या क्षत्रियांची, तीच त्यांना निकट असलेल्या सूतांची. नुसती लढाईची बातमी सांगणारा संजयसुद्धा भोवताली चाललेल्या झगड्यात अलिप्त राहू शकला नाही, हे वारंवार दिसते. द्रोण, अश्वत्थामा ह्यांच्यासारखीही माणसे मनाच्या व शरीराच्या आत्यंतिक दुःखदायी