पान:युगान्त (Yugant).pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

६२ / युगान्त

 महाभारतामध्ये व्यक्ती म्हणून विदुराचे एक विशेष असे स्थान व कार्य आहे. त्याशिवाय तो एका विशिष्ट वर्गातला होता. त्या सबंध वर्गाचेही एक विशेष कार्य ह्या कथेत आहे. त्याच्या वर्गाची दुःखे ती विदुराची होतीच आणि शिवाय त्याची स्वतःची अशीही दुःखे होती. विदुर 'क्षत्ता' होता. 'क्षत्ता', 'सूत' किंवा 'पारशव' अशी ह्या वर्गाची नावे होती. त्यांची स्पष्ट व्याख्या करणे कठीण आहे. कर्ण ह्या वर्गातला होता. एका क्षत्रिय - कुमारीचा ( कुंतीचा ) जन्मताच टाकून दिलेला आणि एका सूताने ( अधिरथाने) पुत्रस्थानी मानलेला म्हणून तो 'सूत' होता, असे 'विराटपर्वा' वरून दिसते. म्हणजे पाळलेल्या कर्णाखेरीज अधिरथाला व राधेला इतरही मुले होती व ती सूतवर्गातीलच होती. कर्णाने स्वतः सूतांशीच शरीरसंबंध जोडलेला होता. त्याच्या सुना, जावई सूतच होते. प्रत्यक्ष पाहून सबंध युद्धाची माहिती देणारा संजय सूतच होता. धृतराष्ट्राला वैश्य स्त्रीपासून झालेला युयुत्सू धृतराष्ट्रपुत्र म्हणून माहीत होता, पण तोही क्षत्ता किंवा सूतच होता. अंबिका व अंबालिका ह्यांची कुणी-एक दासी व व्यास ह्यांपासून जन्मलेला विदुरही सूतच होता. विदुराची बायको "कन्या पारशवी" ही सूतवर्गातलीच होती. सुदेष्णेचा भाऊ, विराटाचा सेनापती कीचकही सूतच होता. नैमिषारण्यात ऋषींना महाभारतकथा सांगणारा उग्रश्रवा रोमहर्षणीही सूतच होता. सूत सारथी होते, अस्त्रजीवी होते, पुराण व राजवंश जाणणारे होते. सूत व मागध ह्यांचा उच्चार एका समासात केलेला आढळतो, पण मागधांचे स्थान सूतांच्या बरेच खालचे होते. सूत हे क्षत्रियांना फार जवळचे आप्त असे वाटत. याचे कारण असे दिसते की, क्षत्रियांना सूत हे बरेच वेळा सावत्र भाऊ असत (विदुर व युयुत्सू ). मागध नुसते स्तुतिपाठक, तर सूत बरेच वेळा बरोबरीचे तर कधीकधी डोईजड (उदाहरणार्थ, कीचक) झालेले असत. ते आपल्या क्षत्रिय भावांना व पोशिंद्यांना उपदेश करू शकत (संजय, विदुर ). त्यांच्या मसलतीत बरोबरीने