पान:युगान्त (Yugant).pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ५९






चार



पिता-पुत्र




 पोरक्या पांडवांचे रक्षण कुणी केले ? कुंती जागरूक होती, पण त्यांना मारायच्या ज्या युक्त्या योजिल्या होत्या, त्यातून त्यांना कोणी निभावून नेले? - विदुराने.
 भीष्माने धृतराष्ट्राच्या आणि पांडूच्या मुलांना शिकवण्याची व्यवस्था केली, पण पांडवांच्या रक्षणासाठी खास प्रयत्न केले नाहीत. धार्तराष्ट्रांची व पांडवांची स्पर्धा होती हे त्याला उमजलेच नव्हते, असे तर नाही? तो काही करण्यास असमर्थ होता का ? का तो उदासीन होता? जे कुळ निर्वंश व्हायला घातले होते, ते सावरले. एकही नव्हता तेथे दोघे आले, व दोघांचे एकशे-पाच झाले. त्या एकशे-पाचांतले काही गेले, तरी त्याला पर्वा नव्हती. कुरूंचा वंश हस्तिनापूरच्या गादीवर असला म्हणजे मिळवली. एवढ्यापुरताच का भीष्म जागरूक होता ? तसे म्हणता येत नाही; पण एवढे मात्र खरे की, द्रौपदीच्या स्वयंवरापर्यंत भावाभावांच्या स्पर्धेची व धृतराष्ट्राच्या दुष्ट हेतूंची त्याने मुळीच दखल घेतली नाही. त्याला त्याची वार्ताही नव्हती असे दिसते. पांडवांच्या हिताला बापाप्रमाणे जपला तो विदुर. पण विदुर स्वतःच इतका परतंत्र की