पान:युगान्त (Yugant).pdf/७५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ५५

असले पाहिजे. त्या क्षणी कुवारपणी घडलेल्या कृत्याला वाचा फोडण्याची काही लौकिक गरज नव्हती. युद्धाच्या आधी तशी गरज कुंतीला व कृष्णालासुद्धा भासली होती, व ती ते दिव्य करावयास तयार होती. पण आता तसेही नव्हते. कुंतीचे मन तिला खात होते म्हणा, तिची न्यायनिष्ठुर बुद्धी तिला स्वस्थ बसू देईना म्हणा, ह्या वेळी तिने सर्व सांगितले. लोक काय म्हणाले असतील, ते निराळेच. पण स्वतःच्या मुलाची निर्भत्सना तिला ऐकावी लागली. धर्माने म्हणे फार शोक केला, शेवटी सर्व भारतीय युद्धाचे टेपर तिच्यावर ठेवून तो मोकळा झाला ! "तुझ्या गुपिताने आमचा घात झाला. पांचाल नाश पावले. कुरू नाश पावले. द्रौपदीचे मुलगे गेले. अभिमन्यू गमावला. सर्व ह्यामुळे झाले. कर्ण आमचा म्हणून पूर्वीच सांगितले असतेस तर युद्धच ओढवते ना. कर्ण आमच्या बाजूला असता, तर युद्धच झाले नसते."
 एवढेच बोलून तो राहिला नाही, तर 'इतउत्तर स्त्रियांच्या पोटी काही गुपित राहायचे नाही असा एक आचरट शाप सर्व स्त्रीजातीला देऊन तो मोकळा झाला.
 [शाप देण्याचा हा भाग प्रक्षिप्त असण्याचा बराच संभव आहे. कारण स्त्रीपर्वात कर्णाची उत्तरक्रिया धर्माने केली असे येते. पुढे शांतिपर्वात परत एकदा कर्णजन्माची कथा येते, व तेथे धर्माच्या तोंडी शाप घातला आहे. ]
 कुंतीने शेवटी परत एकदा आपला निश्चयी स्वभाव दाखवला. राजधानीत धर्माच्या राजवाड्यात पंधरा वर्षे राहिल्यावर धृतराष्ट्राने अरण्यवास पत्करण्याचा निर्धार केला. धर्म, कुंती, कुंतीच्या सुना, अर्जुन सर्व धृतराष्ट्राला मान देत. पण भीम व त्याच्या चिथावणीने नकुल- सहदेव येता-जाता धृतराष्ट्राला व गांधारीला ऐकू जाईल. असे घालून-पाडून बोलत असत. धृतराष्ट्र या प्रकाराची कागाळी करणे शक्य नव्हते. आता येथून जाणे बरे, असे धृतराष्ट्राने स्वतःसाठी व गांधारीसाठी ठरविले. विदुर व संजयही बरोबर