पान:युगान्त (Yugant).pdf/७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

५४ / युगान्त

कर्णाचा नाश होऊ नये, अशी भावना कुंतीची होती का ? सर्वस्वी आप्पलपोटेपणाच होता का ?
 कुंतीबद्दल तिरस्कार वाटावा असे तिने काही करावे, पण लगेच परत तीच कुंती वेगळ्या स्वरूपात आपल्यापुढे यावी, असे होते. नवऱ्याच्या मृत्यूनंतर माद्रीला दोष देऊन तिचे वाभाडे काढणाऱ्या कुंतीबद्दल संताप येतो, पण तीच कुंती जन्मभर माद्रीच्या मुलांना पोटच्या मुलांप्रमाणे जपते. सहदेवावर तिची व सहदेवाची तिच्यावर विशेष माया होती. द्रौपदी तिघांची बायको करता आली असती, पण ती पाचांची व्हावी, हा हट्ट कुंतीचाच. पाचांत फूट पडू नये, एवढाच का तिचा हेतू असेल ? तिच्या वेळोवेळच्या उद्गारांवरून असे दिसत नाही. तिने त्यांना ओटीत घेतले व शेवटपर्यंत आपले म्हणून अतिशय प्रेमाने वागविले. चुकूनही दुजाभाव दाखवला नाही.
 कर्णाच्याही बाबतीत तिचे वर्तन असेच दिसते. कुवारपणी झालेला मुलगा बाळगणे शक्यच नव्हते. मागाहून त्याला आपला म्हणता येईना. हा तिचा अन्याय कर्ण विसरू शकला नाही; तीही विसरली नाही.
 सर्व युद्ध आटोपले होते. मेलेल्या वीरांच्या अंत्यसंस्कारांचे काम चालले होते. अशा वेळी कुंतीने धर्माला सांगितले, "कर्ण हा मला कुवारपणी झालेला मुलगा. तो तुझा थोरला भाऊ होता. क्षत्रियाला योग्य असे त्याचे संस्कार कर" जी गोष्ट कर्णाच्या जिवंतपणी झाली नाही, ती तो मेल्यावर करण्यात काय अर्थ; असा प्रश्न पडतो. पण त्याचे उत्तर सरळ आहे. 'क्षत्रियाप्रमाणे माझे संस्कार केले नाहीस; माझे जन्मजात स्थान तू नाहीसे केलेस,' हा कर्णाचा आक्रोश होता. तिच्या व त्याच्या शेवटच्या भाषणात त्यावर कर्णाने भर दिला होता. योग्य क्रिया केली की पुरुष सद्गतीस जातो, हा तिचा दृढ समज होता. आपल्या हातून दुसरे काही झाले नाही; निदान हे तरी दिलेच पाहिजे, असे तिला वाटले