पान:युगान्त (Yugant).pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ४९

कुंतीपासून फोडण्याचा डाव दुर्योधनाने पुढे रचायच्या आधीच द्रौपदीमुळे पाचांनाही एकत्र बांधून त्या डावाचा पायाच कुंतीने नाहीसा केला.
 लग्नाने तिने पांडवांना जणू द्रौपदीच्या स्वाधीन केले, व ती बाजूला झाली. पण स्वस्थ बसून कौतुक पहायला अजूनही ती मोकळी झाली नव्हती. तिच्या थोरल्या मुलानेच तिच्यावर पराधीन जिणे लादले. या जिण्याची खंत तिला फार वाटली. द्यूतात सर्वस्व हरून पांडव वनवासाला निघाल्यावर विदुराने सांगितले, "कुंती आता तुमच्याबरोबर येणे शक्य नाही. ती सुकुमार आहे; वृद्ध आहे. ती माझ्या घरी राहील" ह्या दुःखात तिला पांडूची व माद्रीची आठवण झाली. 'पांडू नशीबवान. त्याने मुले पाहिली, पण मुलांची ही अवस्था नाही पाहिली.' माद्रीच्या आठवणीत तिच्या स्वतःच्या आयुष्यातील वैफल्याची तीव्र जाणीव परत व्यक्त झाली. "धन्य माद्री! ती ज्ञानी होती. तिला सद्गती प्राप्त झाली 'रती, मती व गती' ह्या सगळ्यांतच तिने माझ्यावर ताण केली. धिक्कार असो माझ्या जीवितप्रियतेला. त्यामुळेच आज मला हे क्लेश भोगावे लागत आहेत.” (२.७.१८-२० )
 तेरा वर्षांच्या काळात तिला काय क्लेश झाले व तिने काय आशा उराशी बाळगल्या, हे उद्योगपर्वात प्रत्ययास येते. द्रौपदीने मुलांना माहेरी सोडून नवऱ्यांसाठी एक प्रकारचा वनवास स्वीकारला होता. माहेरी न जाता विदुराकडे राहून आपल्या शत्रूंचे वैभव रोज डोळ्यांनी पाहण्याचा वनवास कुंतीने पत्करला होता. कृष्ण जेव्हा शिष्टाईच्या वेळी तिला भेटण्यासाठी गेला तेव्हा ती ओक्साबोक्शी मोठ्याने रडली. लहापणापासून भोगलेल्या सगळ्या आपदांची पुन्हा उजळणी झाली. हस्तिनापुराहून जातेवेळी कृष्ण तिला परत भेटला, त्या वेळी कुंतीने मुलांसाठी निरोप सांगितला, त्यात कुंतीचे ह्या वेळचे शल्य, पुढली आशा आणि मनाचा कठीणपणा दिसून येतो. ह्या भाषणात एक वाक्य येते. दुसऱ्याही एक-दोन प्रसंगी जवळ-