पान:युगान्त (Yugant).pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४० / युगान्त

पुत्रपाप्त्यर्थ तिला मंत्र दिले. महाभारतात ह्या मंत्रांना व त्यांच्या अनुष्ठानाला 'अभिचार’ (अभिचाराभिसंयुक्तम्) असे विशेषण आहे. वेदामध्ये अभिचारमंत्र कुणाचा नाश करायचा असल्यास, कुणाचा पाडाव करायचा असल्यास किंवा वशीकरण करायचे असल्यास उपयोजले आहेत. ज्या व्यक्तीवर प्रयोग करायचा, त्या व्यक्तीला काही क्रिया करणे भाग पडेल, असे करण्याची शक्ती अभिचारमंत्रात आहे, अशी कल्पना होती. ह्या मंत्रांनी आवाहन केले, की कोणतेही देव कुंतीला वश होतील, असे हे मंत्र होते. पोरबुद्धीने कुंतीने सूर्याला बोलाविले. त्याने तिच्याशी संग केला व तिला ताबडतोब एक सुंदर मुलगा झाला. कुवारपणी मुलगा झाला, ह्या लाजेने कुंतीने त्याला जन्मतःच टाकून दिले. हाच मुलगा पुढे 'कर्ण' म्हणून प्रख्यात झाला.
 महाभारतात अद्भुत गोष्टी पुष्कळ आहेत. काहींची मानवी पातळीवर संगती लावता येते, काहींची लावता येत नाही. कुंतीला सूर्यापासून मुलगा झाला व त्याला जन्मतःच कवच व कुंडले होती, ही महाभारतातल्या अद्भुत गोष्टींपैकी एक आहे. हिची काही संगती लावता येईल का? कुंतीने ऋषीची सेवा केली. 'सेवा' म्हणजे काय? ह्या सेवेचेच दृश्य फल कर्ण होता का ? तसे असेल, तर त्याचा सूर्याशी संबंध का लावला ? त्याचप्रमाणे सहज (जन्मतःच शरीरावर असलेली ) कवच-कुंडले म्हणजे काय ? कुंतीने मुलाला टाकले, तेव्हा त्याच्याबरोबर द्रव्य ठेवले. तशीच कवच आणि कुंडले ठेवली की काय? कवच आणि कुंडले ही उच्च वर्णाची, विशेषतः क्षत्रियत्वाची निदर्शक होती का? टाकलेले मूल क्षत्रिय आहे, हे दाखवण्यासाठी कुंतीने कवच-कुंडले मुलाजवळ ठेवली का? असे कितीतरी प्रश्न मनात येतात. मुलगा सूत अधिरथाला सापडला. द्रव्याबरोबर सापडला म्हणून अधिरथाने त्याचे नाव 'वसुषेण' असे ठेवले. नावही 'सेन'... पदांतक म्हणून क्षत्रिय वळणाचे. त्यावरूनही वाटते की, कवच-कुंडले पाहून असे ठेवले असावे. एवढे खरे की,