पान:युगान्त (Yugant).pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ३९

 येथे पहिल्या ओळीतील 'ताम्' व दुसऱ्या ओळीतील 'वीर्यवान्' ही पदे पादपूरणार्थ मानावी.
 अर्थ:- त्या शूर सुहृदाने ( शूरसेनाने) आपल्या अपत्याच्या ( जन्माच्या) अगोदरच पहिले ( अपत्य देण्याचे) वचन देऊन, प्रथम जन्मलेली म्हणून ती मुलगी ब्राह्मणांचा अनुग्रह इच्छिणारा अपत्यहीन असा (आपला ) आतेभाऊ जो थोर सखा कुंतिभोज त्याला देऊन टाकली.)
 कुंतीच्या जन्माआधीच तिचे भविष्य ठरून गेले होते. तिच्या आधी जर मुलगा झाला असता, तरच ते चुकले असते. माझे मूल तुला देईन, अशी शपथ घेतलेली. पहिला मुलगा असता तर शूरसेनाने तो खासच दिला नसता, कारण तो राज्याचा वारस झाला असता. पहिली मुलगीच झाली ( कन्याम्), तेव्हा ती द्यायला काहीच प्रत्यवाय नव्हता. म्हणून ब्राह्मणांच्या अनुग्रहासाठी धडपडणाऱ्या कुंतिभोजाला - आपल्या आतेभावाला- ती दिली. मुलींचे जे नाना उपयोग, त्यांतीलच हा एक. लग्नाने तर ती परघरी जाईच, पण त्याच्या आधीही तिला एखाद्या मित्राला देणे, ब्राह्मणांच्या सेवेसाठी देणे ह्यात विशेष काहीच नव्हते. पुढेपुढे पुराणात दशरथाने आपल्या मुलीला अशीच आपला मित्र रोमपाद याला दिली, असे वर्णन आहे. ह्या प्रसंगालाच उद्देशून कुंती पुढे (उद्योगपर्वात) म्हणते की, 'द्रव्य चोरा-पोरी द्यावे, तशी माझ्या बापाने मला दिली.'
 कुंतीचे नाव 'पृथा'. बहुतेक आडव्या अंगाची, म्हणून हे नाव असावे. कुंती-देशच्या भोजाची मुलगी म्हणून 'कुंती' नाव पडले. भोजाने तिला घेतली, ती खाष्ट ऋषीची सेवा करण्यासाठी. तो ऋषी दुर्वास. पुराणे सांगतात की, तो अगदीच वाईट, अपुरे वस्त्र नेसत असे... कदाचित त्याच्या अंगाला घाणही येत असेल. ह्याखेरीज तो भयंकर कोपिष्ट म्हणून प्रसिद्ध होता. ह्या सुवासा (ऋग्वेदः १०.७१.४) क्षत्रियकन्येने वर्षभर त्याची सेवा (?) केली. एकदाही त्याला राग येऊ दिला नाही. त्याने जाताना प्रसन्न होऊन