पान:युगान्त (Yugant).pdf/५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / ३७




तीन



कुंती





१ -
 माणसाच्या आयुष्यात स्वतःच्या हातून घडलेल्या गोष्टी कमी असतात. पुष्कळदा विचार केला, तर वाऱ्याने इतस्ततः भरकटणाऱ्या पानाप्रमाणे आयुष्य वाटते. काही वेळेला आयुष्य सर्वस्वी दुसऱ्याच्या हातात होते, असे वाटते. महाभारतातल्या बायकांचे आयुष्य पराधीन होते. त्यांची सुख-दुःखे ज्यांच्यावर त्या अवलंबून, त्या पुरुषांच्या हाती. कर्ते-करविते पुरुष. त्यांनी करावे, बायकांनी भोगावे. गांधारी, द्रौपदी, सुभद्रा, सगळ्यांची एकच तऱ्हा. पण त्या बायकांनी आयुष्यातल्या काही वेळा तरी वैभव व स्वास्थ ह्यांचा उपभोग घेतला. आंधळ्याशी लग्न झाले, तरी गांधारीला हस्तिनापुरात राजवैभवात राहता आले. नवऱ्याला राज्याभिषेक झाला नसला, तरी ती राणीसारखी राहिली. दुर्योधन राज्य करीत असताना राजमाता म्हणून मिरवली. द्रौपदीने दुःखे भोगली, पण तितकेच मोठे वैभवही भोगले. सुभद्रा कधी पट्टराणी झाली नाही; पण तिचे एकंदर आयुष्य स्वस्थपणे गेले. मुलगा मेला, तरी नातू गादीवर बसला, आणि शेवटी आपल्या व भावाच्या वंशाला तिने