पान:युगान्त (Yugant).pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

३६ / युगान्त

येते. पहा बरे, रानात वणवा कुठे लागला आहे तो. मला आज सकाळपासून धुराचा वास येतो आहे; भ्यालेल्या पक्ष्यांचे ओरडणे ऐकू येत आहे. मला वाटतेय, आपण नदीच्या ज्या बाजूला आहोत, तिकडेच मागे कोठेतरी रान पेटले आहे. त्याची उष्णता भासण्याइतके ते जळत आले नाही. पहा बरे." विदुर, कुंती, गांधारी तिघेही उठून बघू लागली. खरोखरच लांबवर त्यांना धूर दिसू लागला. ज्वाळेची लालसर, पिवळसर हलणारी जीभही त्यांना दिसली. तिघेही खाली बसले. गांधारी हलक्या पण स्पष्ट आवाजात म्हणाली, "महाराज, आपले बरोबर आहे. वणवा पाव योजनसुद्धा दूर नाही." त्यावर धृतराष्ट्र म्हणाला, "गांधारी, शेवटपर्यंत माझा हात धरणे तुला वाटते त्यापेक्षा कठीण आहे. मरणाची वाट पाहत आश्रमात रहायचे, दर पाच - सहा महिन्यांनी मुले आली, की जुन्या दुःखांना उजाळा द्यायचा, परत मन कसेबसे शांत करायचे, ह्या गोष्टी करायला मी कंटाळलो आहे. मी येथेच थांबणार आहे; तुम्हांला नदीपार होऊन वणव्याबाहेर निघता येईल." गांधारीने धृतराष्ट्राचा हात घट्ट धरला. "महाराज, मी आता आपला हात सोडणार नाही. येथे थांबून वणव्याची वाट पाहण्यापेक्षा आपणच त्याच्याकडे जाऊ या ना."
 "बरोबर बोललीस, गांधारी " धृतराष्ट्र उभा राहिला. तो व गांधारी चालू लागली. त्यांच्या मागोमाग कुंती व विदुर चालू लागलेले ऐकून धृतराष्ट्र थबकला. त्याने मागे वळून पाहिले. "तुम्ही पण..." एवढेच तो म्हणाला, व परत वळून चालू लागला.
 एक मोठी विचित्र गोष्ट घडत होती. एक पतिव्रता आपल्या जिवंत पतीचा हात धरून सहगमन करण्यास निघाली होती. एक दीर आपल्या थोरल्या भावाच्या विधवेला चितेवरून उठवण्याऐवजी बरोबर घेऊन चितेकडे चालला होता.

 जुलै, १९६२