पान:युगान्त (Yugant).pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / २९

"गडे, शांत हो." गांधारीने लगेच उत्तर दिले, "अग, तेच तर तुला सांगते आहे. आज मी अगदी सर्वस्वी शांत झाले आहे. आता माझे मन कोणाच्या विजयाने फुलायला नको, कोणाच्या पराभवाने सुकायला नको. कोणाचे कसे होणार, म्हणून काळजीने वरखाली व्हायला नको, कसली भीती नको." हे बोलणे चालले असताना धृतराष्ट्र स्वतःचे दुःख गिळून गांधारीच्या सांत्वनासाठी एका प्रतिहारीचा हात धरून मंदिराच्या दाराशी आला होता. दारातूनच त्याने 'गांधारी गांधारी,' अशी हाक मारली. गांधारीचे शेवटचे वाक्य संपते, तोच तिच्या कानावर ती हाक आली. आपले शब्द किती खोटे आहेत, ह्याचा तिला तत्काळ प्रत्यय आला, आपला आंधळा नवरा जिवंत आहे, तोपर्यंत आपले मन सुख-दुःखांच्या पलीकडे कधी जाणेच शक्य नाही, ह्याची तिला जाणीव झाली. तिरिमिरीने ती उठली, "अगबाई, पण हे - " हे शब्द कसेबसे तिच्या तोंडून बाहेर आले. आयुष्यात दुसऱ्यांदा ती कोसळून धाडदिशी खाली पडली...
 राणी बेशुद्ध पडलेली बघून सर्व परिजन घाईघाईने तिकडे धावले. प्रतिहारीसुद्धा राजाचा हात सोडून गांधारीकडे धावली. मंदिराच्या आत दोन पावले आलेला धृतराष्ट्र एकाकी उभा होता; भोवतालचा गोंधळ त्याला ऐकू येत होता. पण काय झाले, ते कळत नव्हते. आपले दृष्टिहीन डोळे सर्वत्र फिरवीत तो केविलवाणे विचारीत होता, "झाले काय ? झाले काय ?"

४ -
 हिमालयाच्या पायथ्याशी असलेली पर्णकुटी सोडून आज सगळीजण वर पर्वतात जावयास निघाली होती. ह्या खालच्या पर्णकुटीत त्यांच्या सेवेला दासदासी होत्या. शेजारी निरनिराळ्या तपस्व्यांच्या झोपड्या होत्या. धर्मादी राजपुत्र दोनदा येऊन भेटून- राहून गेले होते. एकंदर जीवन संथ व स्वस्थ चालले होते. धृतराष्ट्र