पान:युगान्त (Yugant).pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / २३

त्याने सांगितले, "भीष्माचे रक्षण करतील असे रथ तयार ठेवा, आणखी मुख्यत्वेकरून भीष्माचे रक्षण आणि ज्याच्यावर भीष्म शस्त्र चालवणार नाही, त्या शिखंडीचा वध हे तुमचे उद्दिष्ट राहू द्या." दुर्योधनाची मुले स्वतः भीष्माच्या मागच्या बाजूने रक्षण करीत होती, असे एका श्लोकात सांगितले आहे. त्यानंतर निरनिराळ्या देशांचे राजे व सैनिक भीष्माच्या भोवताली राहून त्याचे रक्षण करीत होते, असाही उल्लेख आहे. तेव्हा भीष्म रथात स्तब्ध असून त्याच्यावर शिखंडी बाण सोडतो आहे, किंवा शिखंडीच्या आडून अर्जुन बाण सोडतो आहे, आणि भीष्म त्या बाणांनी घायाळ होऊन प्रतिकार न करता पडला आहे, हे चित्र सर्व वर्णनांशी विसंगत आहे.
 शेवटच्या दिवशी भीष्माच्या रथाला आणि भीष्माला संभाळणारे कोणी दिसत नाही. भीष्म शेवटपर्यंत दुःशासनाशी बोलत होता. अशा वेळी दुःशासन काय करीत होता ? सर्वांनाच भीष्म नकोसा झाला होता काय ?
 भीष्म सर्वच दृष्टींनी दुर्दैवी. भीष्म मारला गेला नाही. जखमी होऊन पडला. एक, भीष्म इच्छामरणी होता. त्याला उत्तरायण लागल्याखेरीज मरावयाचे नव्हते. दुसरे कृष्णाने अर्जुनाला विनवले होते, 'भीष्माला मारायची जरूर नाही; अर्जुना, त्याला नुसते रथावरून खाली पाड' म्हणजे भीष्मावर जो शरवर्षाव झाला, तो निर्वाणीचा नसून त्याला पाडण्यापुरताच, असे होते.
 ज्या कुलाला जपण्याचा भीष्माने जन्मभर प्रयत्न केला, त्यातील अर्ध्या-अधिक कुलाचा नाश झालेला त्याला जिवंत राहून हालचाल न करता पहावा लागला.
 भीष्म अजिंक्य नव्हता, पण अवध्य होता. इतर शूरांप्रमाणे ताबडतोबीचे मरणही त्याच्या नशिबी नव्हते. शरशय्येवर पडून