युगान्त / १९
हवा होता. तो मोठा वीर अर्जुन होता, व हेच नेमके अर्जुनाला नको होते. पण शेवटी नऊ दिवसांच्या कंटाळवाण्या लढाईनंतर तो मोठेपणा त्याला भीष्माला द्यावा लागला. शिखंडीबरोबर भीष्मावर शरसंधान करावे लागले आणि "मला हे जे तीक्ष्ण बाण लागत आहेत ना, ते शिखंडीचे नव्हेत, अर्जुनाचे आहेत,' हे म्हणण्याची संधी त्याला द्यावी लागली.
युद्ध अठरा दिवस झाले. त्यांतील पहिले दहा दिवस खरे युद्ध झालेच नाही. हे दहा दिवस भीष्म लढाई थांबवायचा प्रयत्न करीत होता, हे त्या दहा दिवसांच्या हकीकतीवरून स्पष्ट होते. प्रतिदिवसाची थोडक्यात हकीकत खालीलप्रमाणे :
पहिला दिवस : कौरवांचे अफाट सैन्य पाहून धर्माला निराशा वाटते. अर्जुन त्याला धीर देतो. पण स्वतःच ऐन सुरवातीला हातपाय गाळतो. कृष्ण गीता सांगून त्याला धीर देतो. धर्म कौरवसैन्यात जाऊन भीष्मद्रोणांना नमस्कार करून येतो. युयुत्सू पांडवांना मिळतो. मोठे युद्ध होते. उत्तर मारला जातो. पहिल्या दिवशी विजयाचे पारडे कौरवांकडे.
दुसरा दिवस : अर्जुन- भीष्म, द्रोण- धृष्टद्युम्न वगैरेंची युद्ध होतात. कलिंगराज व त्याचा मुलगा ह्या दोघांना भीष्म मारतो. पांडवांना दिवस चांगला गेला.
तिसरा दिवस : भीम दुर्योधनाला बेशुद्ध पाडतो. सारथी दुर्योधनाला रथातून पळवून नेतो. कौरवांचे सैन्य माघार घेऊ लागते. दुर्योधन शुद्धीवर येऊन सैन्याला सावरतो व भीष्माला दोष देतो. भीष्म सांगतो, 'पांडव अजिंक्य आहेत, पण मी शिकस्त करीन' भीष्म त्याप्रमाणे करतो. कृष्ण अर्जुनाला दोष देऊन, रथातून उडी मारून चक्राने भीष्माला मारू पाहतो. अर्जुन त्याला परत आणतो. एकंदर दिवसात पांडवांचा जय.
चौथा दिवस : दोन्हीकडचे वीर निकराने लढतात. एकंदर