पान:युगान्त (Yugant).pdf/३८

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१८ / युगान्त

हात बांधल्यासारखे झाले. भीष्म कुलवृद्ध म्हणून पांडवांनाही अवध्यच होता. त्याच्याशी लढणे कठीण नव्हते. पण त्याचे नाते व वय लक्षात घेता ते अशक्य झाले होते. दुर्योधनाला एका बाजूने पेचात टाकून, पांडवांना दुसऱ्या बाजूने पेचात टाकून शक्य तर युद्ध थांबवायचे, असा भीष्माचा प्रयत्न होता. भीष्माने खरोखरच मोठी मुत्सद्देगिरी लढवली होती. पांडव मला मारणे शक्य नाही, हा त्याचा कयास बरोबर होता. दुर्योधन, त्याची भावंडे, मुले, नातवंडे ह्यांना चोपून काढायला, पांडवांना काही वावगे वाटलेले दिसत नाही. अर्जुनापुढे मुख्य प्रश्न होता भीष्म- द्रोणांचा. 'कथं भीष्ममहं संख्ये द्रोणं च मधुसूदन । इषुभिः प्रतियोत्स्यामि' हा त्याचा आक्रोश होता. कृष्णाने एवढी गीता सांगितली, ती ह्या एका बाबतीत फुकटच गेली. पांडवांना भीष्म अवध्य होता पण पांडवांच्या सोयऱ्यांना तो तसा नव्हता. भीष्माच्या वधासाठी शिखंडी जन्माला आला होता. व बापाचा पराभव करून त्याचे अर्धे राज्य हिरावून घेणाऱ्या द्रोणाचा सूड घ्यायला धृष्टद्युम्न जन्माला आला होता. दोघांनीही आपली ठरवलेली कामगिरी बजावली.
 भीष्माचा वध अर्जुनाने करावा, म्हणून कृष्णाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. महाभारतात असे दाखवले आहे की, तो दोनदा (तिसऱ्या दिवशी व नवव्या दिवशी) स्वतः भीष्मावर चालून गेला. दोन प्रसंगापैकी पहिला उघड-उघड मागाहून आहे. नवव्या दिवशी हातात चाबूक घेऊन कृष्ण धावून गेला. अर्जुनाने त्याच्या पायाला मिठी मारून त्याला परतवले व 'मी भीष्माला मारणार नाही, पण रथातून खाली पाडीन,' असे वचन मोठ्या मिनतवारीने धर्म व कृष्ण ह्यांना दिले व दहाव्या दिवशी खरोखरच तसे केले. भीष्माचा योद्धा म्हणून लौकिक होता. आपण पडलो, ते मोठ्या वीराच्याच हातून, हा लौकिक त्याला