पान:युगान्त (Yugant).pdf/३७

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १७

कॅथॉलिकांच्या मठात शिरण्यासारखा तो प्रकार होता. मनात घेतलेली शपथ मोडता येते. चार-चौघांसमक्ष देखावा उभा केला की त्याला चिकटून बसावेच लागते. त्याचप्रमाणे आपली स्वतःची अशी एक भूमिका तयार झालेली असते, ती 'स्व'ला सोडता येत नाही. आतून व बाहेरून असे दोन्हीकडून भूमिका वठवण्याचे दडपण येते. ज्या कार्यासाठी भूमिकेचा स्वीकार केला. त्या कार्याचा परिपोष होत नाही, नव्हे, सर्वनाश होत आहे, हे दिसत असताही माणूस भूमिका सोडू शकत नाही. गांधारीचे डोळे बांधणे, भीष्माचे ब्रह्मचर्य, रामाचा वनवास ही व अशी अनेक उदाहरणे देता येतील. प्रतिज्ञापालन हा एक मोठा गुण होऊन बसला होता. प्रतिज्ञा कशासाठी केली, ह्याचा विचार सर्वस्वी मागे पडला होता. नवऱ्यामागे सती जाणाऱ्या कित्येकांच्या मागे असेच सामाजिक दडपण असणार. आचारांमागची भूमिका काय, तीत साधले काय, कोठल्या मूल्यांची जोपासना झाली, हा विचार मागून आलेल्या टीकाकाराला करणे सोपे. प्रत्यक्ष त्या काळात ती भूमिका वठवणाऱ्याला ते शक्य नसते. भूमिकांच्या ठामपणात एक प्रकारचे प्रवाहपतितत्त्व असते. तसे तर भीष्माचे झाले नसेल ना? अशा प्रसंगांमुळेच अतिमानुष व्यक्तीसुद्धा दुबळी वाटू लागते.
 दुर्योधनाला लढाईला प्रोत्साहन देणारे, त्याची बाजू घट्ट धरणारे असे तिघे : शकुनी, दुःशासन व कर्ण. पहिल्या दोघांना बाजूला करणे भीष्माला शक्य झाले नाही. पण त्याने युक्तीने कर्णाला 'बाजूला काढले व दहा दिवस तो लुटुपुटीची लढाई खेळला. कुलवृद्ध म्हणून पांडवांनी त्याला जो मान दिला नाही, तो देण्याचा उपचार दुर्योधनाने केला. भीष्म हा मान नाकारील, असे त्याला वाटले असले पाहिजे. पण भीष्माने ताबडतोब होकार देऊन सेनापतीपद स्वीकारले. भीष्म मरेपर्यंत दुर्योधनाचे