पान:युगान्त (Yugant).pdf/३६

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१६ / युगान्त

असे शकुनी नसता, तर भीष्माने आपल्या अधिकारात राज्याची वाटणी केली असती. पण मुले जशी मोठी झाली, तसतसे भांडण विकोपाला गेले, व शेवटी युद्धाशिवाय भांडण थांबत नाही, झाले. खरोखर भीष्माचीच मुले-नातवंडे असती, तर कदाचित तो सत्यवतीप्रमाणे वनात गेला असता. स्वतःसाठी म्हणून जो संसार मांडलेला असतो, त्यातून मन काढून घ्यावे, हा दंडक आहे. पण लोकांच्या जबाबदाऱ्या पत्कारल्या की मन त्यात जास्तच गुंतून पडते. म्हातारे झाले की मुले बाजूला सारतात. तेव्हा आपण होऊनच बाजूला सरण्याचा शहाणपणा सुचतो. पण देशाला, संस्थेला, जनसेवेला वाहून घेतलेले लोक वानप्रस्थ स्वीकारताना फारसे दिसत नाहीत. स्वतःचा संसार सोडला नाही, तर लोक म्हणतात, म्हाताऱ्याला लोभ सोडता येत नाही; पण स्वतःच्या संसारावर पाणी सोडून इतरांच्या संसाराचा भार पत्करला, म्हणजे हे बंधन नाहीसे होतेसे दिसते. जिवात जीव असेपर्यंत कुटुंब संभाळलेच पाहिजे, अशी भीष्माची भूमिका होती व सेनापतिपद स्वीकारून, कर्णाला दुखवून बाजूला सारण्यातही हाच हेतू होता.
 स्वतःच्या न ऐकणाऱ्या मुलांना राजा शिक्षा करू शकत असे. भीष्माला ते शक्य झाले नाही. सत्यवतीची मुले मेली, तेव्हा तिने 'प्रतिज्ञा सोडून लग्न कर व राज्यावर बैस,' अशी भीष्माला गळ घातली. कुरुकुलाचे एवढे प्रेम होते, तर त्याने ते का ऐकले नाही ? शिशुपालाने अगदी हाच प्रश्न केला होता. मागे कर्तव्याबद्दल जे म्हटले, ते येथे लागू पडते. भीष्माने एक फार मोठी प्रतिज्ञा करून बापाकडून व इतरांकडून अतोनात प्रशंसा मिळवली होती. आपले असे एक व्यक्तिमत्त्व तयार केले होते. लोकांच्या मनात स्वतःबद्दल काही अपेक्षा निर्माण केल्या होत्या. त्या सर्व पूर्ण करणे त्याला प्राप्त होते. ब्रह्मचर्याची शपथ घेऊन