पान:युगान्त (Yugant).pdf/३५

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / १५

वर्षांचा असण्याची शक्यता आहे. वनवास व अज्ञातवास संपल्यावर अभिमन्यूचे उत्तरेशी लग्न लागले, त्यावेळी अभिमन्यू सोळा वर्षांचा, अर्जुन चौतीस वर्षांचा व भीष्म एकोणनव्वद वर्षांचा ठरतो. अभिमन्यूच्या लग्नापासून लढाईच्या सुरवातीपर्यंतचा काळ जेमतेम वर्षांचा होता असे धरले, तर युद्धाच्या वेळी भीष्माचे वय नव्वद वर्षांचे होते; अर्जुनाचा पहिला वनवास बारा वर्षांचा धरला, तर एकशे - एक वर्षांचे होते, ही कालगणना सगळीकडे कमीत कमी वर्षे धरून केलेली आहे. ह्याच्यापेक्षा भीष्माचे वय कमी धरणे शक्य नाही. सगळ्या कुरूंच्यामध्ये तो वयाने मोठा होता. कुरुवृद्ध आणि पितामह अशी त्याची दोन विशेषणे वारंवार येतात. एवढ्या म्हातारपणी सेनापतिपदाचा हट्ट धरणे हे भीष्माच्या लढाईपर्यंतच्या चरित्राशी विसंगत वाटते.
 भीष्माकडे दुर्योधन आला व म्हणाला, "आपण सर्वांत वडील; नामवंत योद्धे. आपण सेनापती व्हावे."
 भीष्माने स्वतःसाठी म्हणून जे होते, त्याचा त्याग केला; पण एक मोठी जबाबदारी शिरावर घेतली. ती म्हणजे कुरुकुलाचे रक्षण. हे रक्षण करताना त्याला कोणाशी लढाई द्यावी लागली नाही. पण दोन पिढ्यांचा संसार संभाळावा लागला. त्याने लहानांचा संभाळ केला, आंधळ्या अपंगांचीसुद्धा लग्ने लावून दिली. पांडव - धुतराष्ट्र लहान असताना, तीन पिढ्यांत पहिल्यांदाच हस्तिनापुराच्या राजघराण्यात बरेचसे तरुण राजपुत्र जन्माला आले असताना, त्यांना वाढवण्याची व शस्त्रविद्या शिकवण्याची व्यवस्था केली. दोन पिढ्या अव्याहत कर्तेपणा गाजवला. त्याच्या अधिकाराला पहिला शह शकुनीच्या येण्यामुळे उत्पन्न झाला. शकुनी आपल्या आंधळ्या मेहुण्याच्या व डोळ्यांवर कातडे ओढलेल्या बहिणीच्या हितास जपत होता.