पान:युगान्त (Yugant).pdf/२४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

४ / युगान्त

आपल्या गुणांनी सर्वांचा आवडता झाला. मृत्यूने सुटका न होता हा जीव येथेच अडकला; एका प्राचीन राजघराण्याचा तो युवराज झाला.
 अशी चार वर्षे गेली. शंतनूचा शिकारीचा नाद कायमच होता. ह्या वयात परत एकदा तो एका सुंदर स्त्रीच्या आहारी गेला. तिने नाही, पण तिच्या बापाने ह्या वेळी लग्नाच्या अटी घातल्या. अटी सर्वस्वी मानवी लोकव्यवहाराला धरून होत्या. पण त्यामुळे देवव्रताच्या आयुष्याला परत एकदा कलाटणी मिळाली.
 "ह्या मुलीच्या मुलाला राजपद मिळत असेल तर मुलगी देतो." ह्या दाश-राजाच्या मागणीला शंतनूला रुकार देववेना. तो खिन्न मनाने राजधानीत आला. त्याची मनःस्थिती जाणून घेण्याचा देवव्रताने प्रयत्न केला. शंतनूचे उत्तरही मोठे मजेदार आहे. "अरे, मला कसली काळजी? तुझ्यासारखा गुणी मुलगा राज्य संभाळायला आहे. भीती वाटते ती एवढीच की, तू एकटाच आहेस. तुला काही झाले, तर राज्याचे होणार कसे ?" राजपुत्र इतर राजपुरुषांकडे गेला व त्याने सर्व बातमी काढून घेतली. मग शंतनूला न सांगताच अमात्य व इतर कुलवृद्ध बरोबर घेऊन तो दाश-राजाकडे गेला व त्याने शंतनूसाठी सत्यवतीला मागणी घातली. दाश-राजाने आपली अट सांगितली, तेव्हा सर्व माणसांपुढे देवव्रताने प्रतिज्ञा केली: "मी राज्यावर बसणार नाही." पण तेवढ्याने दाश-राजाचे समाधान होईना. "ते सर्व ठीक; पण तुझी मुले राज्यासाठी माझ्या मुलीच्या मुलांशी भांडतील, त्याचे काय?" राजपुत्राने दुसरी पहिल्या पेक्षाही अवघड अशी प्रतिज्ञा केली : "मी यावज्जीव ब्रह्मचारी राहीन !" ह्या कठीण प्रतिज्ञेमुळे देवव्रताला 'भीष्म' हे नाव पडले. दाश-राजाचे समाधान झाले. त्याने गंधकालीला -आपल्या मुलीला -