पान:युगान्त (Yugant).pdf/१८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वीस / युगान्त

जागोजाग दाखविल्या आहेत. त्या जमेस धरूनच बहुतेक करून मी अमके प्रक्षिप्त, अमके मागाहून घुसडलेले, असे म्हटले आहे. क्वचित एखाद-दुसऱ्या ठिकाणी स्वतःची बुद्धी वापरून तसे म्हटले आहे.
 संशोधित आवृत्ती ही सटीक आवृत्ती नव्हे. ती काय व तिच्या मर्यादा काय, हे कळलेच असेल. ही आवृत्ती हाताशी आली आहे. आता तिच्यावर पुढचा अभ्यास होऊन अंतर्गत संशोधनाने अगदी उघडउघड प्रक्षिप्त भाग काढले, म्हणजे दुसरी संशोधित आवृत्ती सिद्ध होईल. मग परत आणखी खोलात शिरता येईल. काम क्रमाक्रमाने, टप्प्याटप्प्याने विशिष्ट तत्त्वांनी व महाभारताच्या जगातील सर्व अभ्यासकांची मदत घेऊन झाले पाहिजे. असले काम तत्त्वतः सौंदर्यशोधाचे नसते. पण सौंदर्यशोध व आनंदबोध हे दोन्ही असल्या कामाचे फळ म्हणून मिळतात. हा फक्त वाङ्मयीन शोध नव्हे. आपल्या सांस्कृतिक मुळांचा हा शोध आहे. हा शोध चालला म्हणजे इतरही सांस्कृतिक इतिहास समजू शकतो, समजायला मदत होते. महाभारतावरून आपली प्राचीन कुटुंबसंस्था, राजकीय संस्था, धार्मिक व्यवहार काय होते, हे कळून आपल्या सांस्कृतिक इतिहासातला एक टप्पा जाणवतो. त्या अनुषंगाने इतरही प्रश्न डोकावतात. प्रो. सुखटणकरांनी आपल्या लेखांत लिहिले आहे की, शारदापोथी ही पुष्कळ वेळा दक्षिणेकडील मल्याळी पोथीशी कमालीचे साम्य दाखवते. त्याला दोन कारणे असू शकतील :
 १) पूर्वी महाभारत - कथा जेव्हा दक्षिणेत पोहोचली, तेव्हा उत्तरेत प्रसृत असलेल्या आवृत्तीत व तिच्यात फारसा फरक नसावा. मल्याळी म्हणजे केरळ देश एका टोकाला. तेथे ती भर न पडता राहिली. उलट, आंध्र-प्रदेशात इतर प्रदेशांप्रमाणे तीत भर पडत गेली.
 २) ह्या कारणाखेरीज दुसरे असेही संभवते की, पश्चिमेकडील किनाऱ्याने खाली शिरणारे आर्यभाषिक ब्राह्मण पंचनद्यांच्या प्रदेशातील (पंजाबातील व काश्मिरातील) असतील, व