पान:युगान्त (Yugant).pdf/१७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / एकोणीस

शारदा - आवृत्तीतही नाहीत. म्हणजे देवबोधाची टीका व शारदा- आवृत्ती एकमेकींना पूरक आहेत. शिवाय, अर्वाचीन आवृत्तीत आलेले नवे शब्द तीत नसून शारदेत आलेले जुने शब्द आहेत, त्यांचा अर्थही नीट लावलेला आहे. ह्यांखेरीजही इतर टीकाकार होऊन गेले.
 महाभारताच्या पोथ्या, टीकाकार वगैरे वर दिलेल्या साधनां- शिवाय महाभारताचे श्लोक व आख्याने इतर कोठे आलेली असल्यास त्यांचाही उपयोग केलेला आहे. उदा. भीष्मपर्वाचे संपादन करताना प्रो. बेलवलकरांनी असे दाखवले आहे की, सध्या आपल्याला माहीत असलेली गीताच शंकराचार्यांच्या पुढे भाष्य करताना होती.
 ह्या सर्वांचा अर्थ हा की, सध्या संपादित केलेली आवृत्ती जुन्यांत जुन्या माहीत असलेल्या हस्तलिखितांच्या परीक्षणाने सिद्ध झालेली आहे. हे हस्तलिखित सन १०००च्या सुमाराचे असावे. म्हणजे महाभारतकथा ख्रिस्तपूर्व १०००ची धरली, तर घडलेल्या वृत्तांताच्या नंतर ते २००० वर्षांचे आहे. आज जी आवृत्ती आपल्या पुढ्यात आहे, तिच्यात उघड-उघड प्रक्षिप्त भाग असूनही सर्व जुन्या पोथ्यांत - विशेषतः : शारदा व मल्याळम् अशा दोन टोकांच्या पोथ्यांत तो आहे म्हणून हात न लावता तो जसाच्या तसा ठेवला आहे. खुद्द संपादकांनी ठिकठिकाणी हे दाखविले आहे. पण त्यांच्यापुढे जे कार्य होते (जुनी पोथी काय. ते हुडकून काढणे), त्यामुळे अंतर्गत विरोधात त्यांना शिरता येत नव्हते. जुने सौत वाङ्मय ब्राह्मणांच्या हाती जाऊन अध्यायाचे- अध्याय भृगु- कथा त्यांत घुसडल्या गेल्या आहेत. कृष्ण ज्यात मुख्य देवता आहे, तो भागवतधर्म प्रचारात आल्यावर कृष्णाच्या अतिमानुषत्वाच्या व देवपणाच्या गोष्टी व अवास्तव स्तुती त्यात मागाहून आली आहे. सध्याच्या पोथीमध्येच महाभारताला दोन सुरवाती आहेत. अशा एक ना दोन अनेक गोष्टी खुद्द सुखटणकरांनी व इतर संपादकांनी