चौदा / युगान्त
महाभारत - संपादनात एक हजारावर हस्तलिखिते तपासण्यात आली. काही पोथ्या सबंध महाभारताच्या मिळाल्या, काही थोड्याशा पर्वांच्याच मिळाल्या. सर्वच सारख्या महत्त्वाच्या नव्हत्या. त्यांतल्या ज्या महत्त्वाच्या ठरल्या, त्यांची फारच बारकाईने छाननी झाली. नव्या संशोधित आवृत्तीतील शब्द-न्-शब्द बाकीच्या आवृत्त्यांतील शब्दांशी ताडून पाहिला आहे. हे सांगितले, म्हणजे काम किती किचकट व परिश्रमाचे होते, हे कळेल.
महाभारताच्या आवृत्त्या गोळा केल्यावर सुखटणकरांनी जी पहिली गोष्ट प्रस्थापित केली, ती ह्या निरनिराळ्या आवृत्त्यांचे वर्गीकरण व त्यांतील फरक. त्यात असे दिसून आले की, मिळालेल्या आवृत्त्यांची 'उत्तरेकडल्या' व 'दक्षिणेकडल्या' अशी प्राथमिक विभागणी होते. उत्तरेकडल्या आवृत्त्यांत एकमेकींशी मिळत्या-जुळत्या पुष्कळ गोष्टी आहेत; तसेच दक्षिणेकडच्या पोथ्यांतून आपापसांत साम्य आहे. उत्तरेकडच्या पोथ्यांचे परत दोन विभाग पडतात. एकात शारदालिपीत लिहिलेली, काश्मिरात भूर्जपत्रांवर लिहिली गेलेली एक पोथी, व त्याच पोथीच्या वा तसल्याच पोथीच्या आधारे केलेल्या इतर पोथ्या. ह्या गटाला 'K' नाव दिलेले आहे. दुसऱ्या विभागाचे परत दोन भाग पडतात. एकात मैथिली, बंगाली व नेपाळी लिपीत लिहिलेल्या पोथ्या व दुसऱ्यात देवनागरी लिपीत लिहिलेल्या पोथ्या. दक्षिणेकडील पोथ्यांचेही दोन विभाग पडतात. एका विभागात तेलुगू व ग्रंथ लिपीत लिहिलेल्या पोथ्या व दुसऱ्या विभागात मल्याळी लिपीत लिहिलेल्या पोथ्या. ह्या पोथ्यांचा एकमेकांशी व मूळ भारताशी काय संबंध असावा, हे खालील आकृतीवरून सुखटणकरांनी दाखविले आहे.
आज ज्या आवृत्त्या उपलब्ध आहेत, त्या सर्व तळाच्या ओळीतील, वरच्या ओळींतील सर्व आवृत्त्यांचे काय झाले असावे, ह्याचा तर्क करून त्या कल्पिलेल्या आहेत, व्यासाने भारत सांगितले, ते पाच शिष्यांना, तीच पांडवांची 'जयगाथा'. 'जय'