पान:युगान्त (Yugant).pdf/११

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

युगान्त / तेरा

मांडणार नव्हते; पण बऱ्याच मित्रांनी परत परत हेच प्रश्न विचारले, म्हणून लिहीत आहे. ज्यांना अगोदरच माहिती आहे, ज्यांनी सुखटणकरांचे मूळ लेख वाचले आहेत, त्यांनी त्या लेखांवरूनच घेतलेली ही माहिती वाचण्याची गरज नाही. तसेच, ज्यांना इतिहासाच्या काथ्याकुटात शिरायचे नाही, त्यांना हा भाग न वाचताही लेख समजायला काहीच अडचण नाही. पण बऱ्याच जणांना जिज्ञासा आहे; माझी भूमिका काय, हे समजायला त्यामुळे मदत होईल, असेही त्यांना वाटते. म्हणून थोड्याशा अनिच्छेनेच हे विवरण करीत आहे.
 ज्या पुस्तकाचे शास्त्रीय संपादन होते, ते जुने असते. काही दशकांचे असेल, काही शतकांचे असेल, काही सहस्त्रकांचे असेल. त्याचा ग्रंथकार (-एक वा अनेक- ) जिवंत नसतो. आणि त्याच्या बऱ्याच आवृत्त्या प्रचारात असतात. बऱ्याच वेळा तो ग्रंथ निरनिराळ्या भाषांतूनही असतो. अशा वेळी सर्व उपलब्ध आवृत्त्या तपासून, सर्वात जुनी, शक्य तर ग्रंथकाराच्या वेळची आवृत्ती संपादन करण्याचा जो प्रयत्न, त्यालाच एका प्रकारची संशोधित (critical) आवृत्ती म्हणतात. दुसऱ्या तऱ्हेच्याही संशोधित आवृत्त्या असतात. ते पुढे दिलेले आहे. बायबलच्या अशा आवृत्त्या सारख्या निघत आहेत. काही नवा शोध लागला की, जुन्या आवृत्तीवर प्रकाश पडत राहतो. म्हणजे अशी एखादी आवृत्ती काढली, तर ते शेवटचे संशोधन झाले, असे म्हणता येत नाही. अमक्या एका काळी जो पुरावा उपलब्ध होता त्यावर आधारलेली अमकी आवृत्ती, एवढेच म्हणता येईल. महाभारताच्या संपादकांचाही एवढाच दावा आहे. महाभारताचे एखादे नवे हस्तलिखित भारतातच नव्हे, तर भारताबाहेर चीन, तिबेट, ब्रह्मदेश इकडे मिळाले, तर ते मिळवण्याची खटपट हेच संपादक पहिल्याने करतील व त्यामुळे जास्त आधीचे काही मिळाले, तर त्याबरहुकूम आपल्या आवृत्तीत सुधारणा करतील.