पान:मृच्छकटिक.pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प रि च य

 'मृच्छकटिक' हे नाटक शूद्रक नांवाच्या एका रसिक राजाने लिहिलें. अर्थात् संस्कृत वाङ्मयांतील इतर अनेक नाटकांप्रमाणे व नाटककारांप्रमाणे याहि नाट- काचा लेखन-काल व कर्ता याविषयी खूप मतभेद आहेत. परंतु अनेक दृष्टींनी हे नाटक असामान्य आहे, यांत कांही शंका नाही. आजहि वाचणाराला त्यांत अगदीं ताजे- पणा व जिवंतपणा वाटतो. याचे मुख्य कारण, शूद्रकाने नाटकांतील वातावरण अगदी खरेखुरे रंगविलेलें आहे.

 वास्तविक, तसे पाहिले तर चारुदत्त या एका उदात्त स्वभावाच्या ब्राह्मणाची आणि वसन्तसेना नांवाच्या गणि- केची ही एक प्रेमकथा आहे. परंतु तींत शूद्रकाने इतक्या विविध गोष्टी आणलेल्या आहेत. शर्वीलक व मदनिका यांच्या प्रणयाचे उपकथानक, राज्यक्रांति, जुगार, परोपकारी निःस्वार्थ पराक्रम, कौशल्यपूर्ण चोरी इ. आणि या सर्व गोष्टी नाटकांत कशा अगदी चपखल बसून गेलेल्या आहेत.

 उदात्त मानवी स्वभावाचे सुंदर नमुने आणि विचित्र दैवगतीचा विलक्षण खेळ या नाटकांत भरपूर पाहावयास सांपडेल, तत्कालीन समाजाचे यथातथ्य व जिवंत चित्र 'मृच्छकटिकां'त दिसेल. 'मृच्छकटिका' म्हणजे मातीची खेळांतली लहान गाडी. या नांवांतच नाटकांतील पात्रां- च्या परिस्थितीचे व स्वभावाचे प्रतिबिंब उत्तमरीतीने उमटलेले आहे.

लेखक