पान:मृच्छकटिक.pdf/21

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( २० )


आणि वसन्तसेनेनेंं लगेच तिचा स्वीकार केलाहि. नंतर तिनेंं इतकेंंच सांगितले कींं, 'मी आर्य चारुदत्तांच्या भेटीला येत आहे एवढे त्यांना कळवा.'

 मैत्रेय मनांतल्या मनांत थोडा रुष्ट होऊनच निघून गेला. वसन्तसेनेच्या लोभीपणाचेंं त्याला आश्चर्य वाटत होते आणि रागहि आला होता.

 मैत्रेयाबरोबर दिलेल्या निरोपाप्रमाणे तिला लगेच आपल्या प्रियकराच्या भेटीसाठींं निघावयाचे होते. परंतु अकस्मात मुसळधार पाऊस सुरू झाला. विजा चमकत होत्या. मेघ गर्जत होते. परंतु वसन्तसेनेला आतां धीर धरवत नव्हता. तिने शर्वीलकाच्या हातून परत आलेले दागिने आणि मैत्रेयानेंं दिलेली रत्नमाला दोन्ही बरोबर घेतली आणि ती चारुदत्ताच्या घराची वाट चालूंं लागली. वाऱ्यावादळाला तोंड देत भिजून ओलीचिंब झालेली ती चारुदत्ताच्या घरी येऊन पोहोंचली, तेव्हां चारुदत्त तिच्या स्वागताला दारांतच उभा होता.

 ‘जुगारांत चुकून हरलेले दागिने' आणि 'त्यांच्या मोबदल्यांत पाठविलेला' रत्नहार या दोन्ही गोष्टी वसन्तसेनेजवळ पाहून चारुदत्त आश्चर्यचकित झाला. परंतु त्या दागिन्यांची एकंदर हकीकत वसन्तसेनेच्या दासीच्या तोंडून ऐकून तर त्याला वसन्तसेनेच्या थोर अंतःकरणाची खात्री पटली.