पान:मृच्छकटिक.pdf/20

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १९ )

चला. कारण जो दागिने आणून देईल त्याला मदनिका द्यावी असा चारुदत्तांचा निरोप आहे.

 जवळच उभी असलेली मदनिका सारे समजली. तिचे डोळे आंसवांनीं भरून आले आणि अंत:करण मालकिणीच्या थोर औदार्यानेंं आनंदून पाझरू लागले. मदनिकेचा हात पत्नी म्हणून शर्वीलकाच्या हातीं देतांना वसन्तसेनेला केवढेंं समाधान वाटत होते ! वेश्येची दासी आणि एक ब्राह्मणपुत्र यांचा प्रेमविवाह घडून येत होता. परंतु या प्रसंगानेंं शर्वीलकाची मती सर्वस्वीं पालटली. आर्यक त्याचा मित्र होता. त्याची सुटका करून राज्यक्रांति यशस्वी करण्याच्या उद्योगाला तो लागला.

 मदनिका आणि शर्वीलक वसन्तसेनेनेच आणविलेल्या रथांतून निघून गेली आणि मैत्रेय आल्याची वर्दी वसन्तसेनेकडे पोहोंचली.

 मैत्रेयाला वाटत नव्हतेंं कीं, वसन्तसेना एवढ्या मोठ्या किंमतीचा हा रत्नहार थोड्याशा दागिन्याच्या मोबदल्यांत ठेवून घेईल म्हणून. परंतु त्या सरळ वृत्तीच्या ब्राह्मणाची ती अपेक्षा चुकीची ठरली.

 वसन्तसेनेनेंं मैत्रेयाचे स्वागत करून त्याचा आदरसत्कार करतांच मैत्रेय हातांतील ती मौल्यवान रत्नमाला पुढे करीत म्हणाला, " मित्र चारुदत्तानेंं द्यूतांत आपले दागिने चुकून घालविले. तेव्हां त्यांच्या मोबदल्यांत ही रत्नमाला त्याने आपल्याकडे पाठविली आहे. तिचा स्वीकार करावा."