पान:मृच्छकटिक.pdf/16

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १५ )

कोठेतरी डल्ला मारायचा. आणि त्या रात्रीं तो डल्ला मारायला आला तो नेमका चारुदत्ताच्या वाड्यांत.

 एक सुंदरसे भोंक पाडून शर्वीलक आंत शिरला. पण पुस्तके, वीणा, मृदंग याशिवाय त्याच्या दृष्टीला मौल्यवान असें कांहींच पडेना. निराश होऊन परतायच्या विचारांतच होता इतक्यांत त्याचेंं भाग्य उघडलें. " मित्रा, चारुदत्ता हे दागिन्यांचे गाठोडेंं घे बाबा आपल्याकडे. एरवीं मला नाहीं शांतपणाने झोंप येत." मैत्रेय झोपेत बरळत होता. आणि झोपेतच त्याने ते गांठोडेंं पुढे केले. शर्वीलक अशी संधी थोडीच दवडणार !

 शर्वीलकाने तेंं सोन्याच्या दागिन्यांचे गांठोडेंं घेऊन पळ काढला तेव्हां रदनिकेनें कोणीतरी पळाल्याचे पाहिलेंं. तिने आरडाओरड केली. मैत्रेय व चारुदत्त जागे झाले. पण इतका वेळ चोर थोडाच तिथे थांबतो ! चारुदत्ताचे लक्ष चोराने पाडलेल्या भिंतींतील भोंकाकडे गेलेंं. ‘वा ! किती सुंदर कलाकृति आहे !' म्हणून त्याचे त्याने कौतुक केले॰ चोराला एका (एकेकाळच्या ) मोठ्या सावकाराच्या घरां- तून हात हालवीत परत जावे लागले नाहीं याविषयी मात्र त्याला समाधान वाटलें.–पण दागिने गेले होते ते दुसऱ्याचे! निर्धन चारुदत्ताचे घर चोरट्यांनी फोडले असे सांगूनसुद्धां कोणी त्याच्यावर विश्वास ठेवला नसता. वसन्तसेनेनेंं एवढ्या विश्वासाने ठेवलेले दागिने गडप करण्यासाठी चारुदत्ताची ही हूल आहे, असेच कोणीहि म्हणालें असतें.