पान:मृच्छकटिक.pdf/14

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
( १३ )

होण्याचे साहस करीना. याचवेळी कर्णपूरक तेथे आला. त्याने एकंदर सर्व परिस्थिति लक्षात येतांच तडक हत्ती- वरच चाल केली. त्याच्या हातांत जे हत्यार होते त्याचा तडाखा बसतांच हत्तीने भिक्षुला सोडून दिलेंं व तो कर्ण- पूरकाकडे वळला. कर्णपूरकानें लगेच त्याला साखळदंडांनी जखडून टाकला.

 कर्णपूरकाच्या हातून हा पराक्रम घडत असतांना चारु- दत्तानें तो पाहिला. त्या परोपकारी पराक्रमाचे कौतुक करावे असे रसिक चारुदत्ताच्या साहजिकच मनांत आलेंं. पण त्याला बक्षीस देण्यासाठी त्याच्याजवळ होते कुठे काय ? आपले मनगट, कान, त्याने चांचपून पाहिले, पण त्यावरचे अलंकार तो केव्हांच देऊन चुकला होता. अखेर अंगावर पांघरलेली उंची शालच त्याने त्या पराक्रमी कर्णपूरकाच्या हाती दिली.

 कर्णपूरक ही सारी हकीकत वसन्तसेनेला स्वतःच सांगत होता. चारुदत्ताच्या औदार्याने तो खरोखरीच आश्चर्यचकित झाला होता. परंतु वसन्तसेना तर नुसते त्याचे नांव ऐकू- नच आनंदांत रंगली होती. तिने कर्णपूरकाच्या हातून ती आपल्या प्रियकराची शाल स्वत:कडे घेतली आणि कर्ण- पूरकाला तिच्या मोबदल्यांत एक सोन्याचा दागिना देऊन त्याची रवानगी केली. त्या रात्रीं चुकून अंगावर पडलेली ती भाग्यशाली शाल अशारीतीनेंं अगदी अकल्पितपणे कायमची आपल्यापाशीं आली याचे तिला कोण कौतुक नि केवढा हर्ष !