पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/93

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

पोकळ जाहीरनाम्यांची खिरापत

 "तुमचे राजवाडे जमीनदोस्त झाले आहेत; तुमचीं उपवनें उध्वस्त झाली आहेत; तुमचे वाडवडील दास्यांत कुचंबत होते. युद्धे उकरून काढण्यांत तुमचे आंग नसतांही तुमच्या मुलांबाळांना रणांगणावर नेण्यांत आले आहे. तुमची धनदौलत सारी लुटली गेली आहे."
 "अहो बगदादचे पौरजनहो ! तुमच्या सव्वीस पिढ्या परकीय अरेरावी राजांच्या दास्यांत बद्ध होत्या व त्यांनी तुमच्या जातीजातींत कलागती लावून देऊन आपला फायदा करून घेतला हे नीट लक्षात घ्या !"
 ( कर्नल लारेन्सने काय केले आहे ? इब्न सौदला आणि मक्केच्या हुसेनला मलिदा कोण चारीत होते आणि कशासाठी ? हल्लीची पिढी काय स्वातंत्र्यसौख्यांत आहे ?)

 युफ्रातीस व तैग्रीस या दोन नद्यांमधील हा प्रदेश तीन विलायतींत विभागला गेला आहे. विलायत म्हणजे इंग्लंड किंवा परदेश असा अर्थ आपल्याकडे केवळ चुकीने झाला आहे. मूळ अर्थ स्वदेश असा असून राज्यव्यवहारकोशांत विलायत म्हणजे स्वदेश असे स्पष्ट म्हटले आहे. बसरा विलायत, बगदाद विलायत आणि मोसल विलायत अशा तीन विलायती मिळून इराकचे राज्य होते. मेसापोटेमिया यालाच म्हणतात. खाल्डिया नामक प्राचीन देशही याच भागांतला. बाबिलोन व निनेव्ह हीं, इतिहासप्रसिद्ध राजपुरें इराकांतच आहेत. जगत्संस्कृतीचा पाळणा प्रथम याच प्रदेशांत बांधला गेला असे रूपक नेहमी योजिले जाते. या तीन विलायतींत किती तरी फरक आढळतो. बगदादला राजकारणाशिवाय दुसऱ्या गोष्टी ऐकू येणार नाहीत, तर बसऱ्याला व्यापाराविना अन्य बाबींकडे लक्ष देण्यास तेथील लोकांना अवसर मिळत नाही. बगदादला व्यापार मुळीच नाही असे नव्हे, पण तेथील लोकांचे मुख्य

८७