पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/85

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

खलिफांच्या नगरींतील मुलाखत

(१२)

 "मला अत्यंत वाईट वाटते ते हिंदुस्थानांतील मुसलमानांच्या अराष्ट्रीय वर्तनाचेच." या शब्दांनी इराकमधील एका राष्ट्रीय मुसलमान पुढाऱ्याने आमच्या मुलाखतीस प्रारंभ केला ! ते पुढे म्हणाले, "धर्माने राष्ट्रांत दुही पडत असेल तर धर्मासच धाब्यावर बसविले पाहिजे आणि महमदाने इस्लाम धर्माची स्थापना केली ती निरनिराळ्या लोकांना एका माळेंत गोवण्यासाठीच. आमच्यांतही शिया आणि सुनी हे भेद आहेत, नाही असे नाही; पण आमचा तंटा हिंदुस्थानांतील वैमनस्याइतका विकोपास जात नाही. माझ्या देशबांधवांस माझें हेंच सांगणे आहे की, प्रथमतः देशहित पहा, धर्माच्या नांवाखाली विभक्त होऊन आपसांत वैर माजवूं नका."
 या 'खलिफांच्या नगरींत ' एका उच्चवर्णीय व मोठ्या अधिकारारूढ असणाऱ्या एका धनकनकसंपन्न पण विद्याविभूषिताने वरील वाक्ये अगदी प्रथमतःच तोंडांतून काढल्यामुळे पुढे काय सद्वचने बाहेर येतात हे ऐकण्यासाठी मी उत्कंठित झालो. माझे विचारावयाचे कांही प्रश्न मी मनांतच योजून ठेविले होते. ते काही काळ तरी दूर सारावे लागले. एका प्रशस्त दिवाणखान्यांत कै. लाला लजपतराय यांचे 'अनहॅपी इंडिया ' वाचीत असलेली धिप्पाड पण ऐन तारुण्यांतील ही पाणिदार व्यक्ति पाहून थोडीशी पं. जवाहरलाल नेहरूंची आठवण झाली. योग्य प्रकारे स्वागत व हस्तांदोलन इत्यादि शिष्टाचार झाल्यावर अगदी धिमा आवाज येऊ लागला.

 "कृपा करून मला खरे कारण सांगा की, हिंदी मुसलमान अशा प्रकाराने का वागतात ? त्यांना आपल्या देशाबद्दल काहीच कसे वाटत नाही ? हिंदुस्थानविषयी माझ्या मनांत काय विचार आहेत हे प्रदर्शित

७९