पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/76

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

युरोपियनांना मेहेरनजरेखाली रहावयास मिळते. हजिरीपत्रकांतही हिंदी व युरोपियन असा भेद केलेला कारकुनांचे बाबतींत दृष्टोत्पत्तस आला.
 इतका जरी पक्षपात होत असला किंवा इराणी सरकारचा ओढा इराणी लोकांकडे असला तरी, अद्यापि महाराष्ट्रीय कार्यकर्त्यास तेथे क्षेत्र आहे. बुद्धीच्या जोरावर त्यांना कोठेही नांव कामवतां येते. पण प्रथमतः त्यांनी बाहेर पडले पाहिजे. मद्रासी, पंजाबी, बंगाली, इत्यादि प्रांतांचे किती तरी लोक परदेशी जात असतां महाराष्ट्रीयांनी स्वस्थ रहाणे इष्ट नाही. आर्थिक दृष्ट्या परदेशची कामगिरी लाभदायक असते. कारण साध्या कारकुनासही येथे दीडशे रुपये मिळतात ! स्वतःच्या कर्तबगारीस पूर्ण वाव पाहिजे असल्यास परदेशी गेले पाहिजे. एकाच ठिकाणी सर्वांनी गर्दी करून भागणार नाही हे आता स्पष्ट दिसत आहे. 'पोटासाटीं भटकत जरी दूरदेशीं' जावे लागले तरी आपले स्वतंत्र राखून बदललेल्या परिस्थितीशी तन्मय होता येते हे दर्शविण्यासाठीच की काय, येथे एक महाराष्ट्रीय कुटुंबांत रहाण्यास मला मिळाले. आबादानमध्ये मुलांमंडळींसह रहाणारे एकच महाराष्ट्रीय गृहस्थ आहेत व त्यांच्या पाहुणचारांत अगदी आपल्या घरी असल्याप्रमाणे वाटलें. केवळ मातृभाषा एक म्हणून आपलेपणा आणि अगत्य किती वाटते हे परदेशी गेल्यावरच कळते. स्वभाषेचा अभिमानही जागृत करण्यास लांब परदेशचा प्रवास फार उपयोगी पडेल ! सध्या मराठीविषयी उदासीन असणारांना जादूच्या कांडीने अन्य देशांत नेऊन ठेवतां आलें तर किती तरी इष्ट बदल घडून येईल असे वाटल्यावाचून रहात नाही.

-केसरी, १२ व २६ मार्च, १९२९.


७०