पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/75

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

परवशतेचे प्रताप

वाटले नाही. खुद्द आबादानच्या कारखान्यांत दीडशे मुलांना पगार देऊन यांत्रिक कौशल्य शिकविण्यास इराणी सरकारने कंपनीस भाग पाडले आहे. दरवर्षी नवीन मुलें तयार होऊन बाहेर पोट भरण्यास जातात आणि अनुकूल परिस्थिति असणारी कारखान्यांतच टिकून रहातात. प्रतिवर्षी दोन इराणी विद्यार्थी कंपनीच्या खर्चाने इंग्लडमध्ये तैलशास्त्राचा उच्च अभ्यासक्रम पुरा करण्यासाठी पाठविले जातात. आमच्या हिंदुस्थानांत अनेक धंदे आहेत. सरकारने परकीय भांडवलवाल्यांस पुष्कळ सवलती देऊन त्यांचे ठाणे मजबूत करून दिलें आहे. पण अशा प्रकारची प्रजाहितदक्षतेची कळकळ कोणत्या एका तरी करारांत दिसत असल्यास अधिकाऱ्यांनी अवश्य जगापुढे मांडावी. साधे लष्करी खाते घ्या, तेथे सुद्धा हिंदी अधिकारी ठेवण्याकरिता किती अट्टाहास करावा लागतो ! हे सारे पारतंत्र्याचे प्रताप !

 युरोपियन मनुष्य म्हटला की, त्याला देवाने जशी काही अधिक कोमल गात्रे देऊन आकाशांतून एकदम पृथ्वीवर पोचते केले आहे अशी कित्येकांची भावना असते. विशेषतः इंग्लिशांना ती विशेष आहे असे घडोघडी दिसून येतें. येथील कारखान्यांत इंग्रज अधिकारी व कामगारही आहेत, पण एशियाटिक कामगारांपेक्षा युरोपियनांस अधिक पगार, अधिक सवलती व अधिक सुखसोयी केलेल्या आढळून येतात. अगदीच प्रामुख्याने डोळ्यांत भरणारी गोष्ट म्हणजे अगदी हवाशीर जागेत त्यांच्यासाठी बसावलेले वेगळे गाव. त्यांचे बंगले निराळे, त्यांची व्यवस्था वेगळी, त्यांची वस्तीही पण अगदीच भिन्न. त्यांना एखादा डोळा अधिक असल्याचें किंवा अधिक काम करण्यासाठी तिसरा हात असल्याचें दिसत नाही. गौरवर्ण हाच एक गुण असेल तर इराणी प्रजाही तितकीच गौरकाय सापडते. पण कांही का कारणाने असेना,

६९