पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/74

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

प्रतिनिधीस कारखाना दाखविण्यासाठी ज्या दोन अधिकाऱ्यांची योजना करण्यात आली होती ते गुप्त पोलिस खात्यांतील वरिष्ठच होते ! रशियन विळ्याची भीति आज काल फार वाटत असल्याने त्या खात्यास विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. असो.
 कंपनीच्या नोकरांना सर्व प्रकारचा माल, योग्य भावाने मिळावा म्हणून, किंवा अस्सल ब्रिटिश मालच खपावा व पानस्वातंत्र्याची हौस पुरविली जावी यासाठी एक दुकान उघडलेले आहे. इतर कोणत्याही मालापेक्षा मदिरेचा खप किती तरी पटींनी अधिक असतो, हे येथील आकड्यांवरूनच सिद्ध होते ! कामगारांचीं रहाण्याची घरे मुंबईच्या सरकारी चाळींपेक्षा किती तरी चांगली आहेत. आरोग्यखात्याकडून होत असलेली साफसुफीची व स्वच्छतेची व्यवस्था पुणे शहर म्युनिसिपॅलिटीने तर शिकण्यासारखी आहेच, पण मुंबईलाही कांही धडे या व्यवस्थेपासून घेता येतील. इराणांत फॅक्टरी अॅक्ट नसला तरी कामगारांच्या नुकसानभरपाईचेंही वेगळे खाते असून अपघातामुळे पोटावर गदा येणाऱ्यांस भरपूर मोबदला देण्यात येतो.

 इराण हें स्वतंत्र राष्ट्र आहे आणि इतर जगाच्या मानाने मागे असले तरी स्वातंत्र्याची राष्ट्रीय वृत्ति आणि स्वहिततत्परता यांस ते अद्याप पारखे झाले नाही. विश्वबंधुत्वाची मोहक शिकवण अजूनही त्याच्या कर्णपथावर गेलेली दिसत नाही. कारण या प्रचंड कारखान्यांत इराणी कामगारांचे प्रमाण सालोसाल वाढलेंच पाहिजे अशी मोठी अट कंत्राट देतांना घातली गेली आहे. म्हणून शेकडा पंच्याऐशी कामगार इराणी प्रजाजनांपैकीच आहेत. वरची मलई खाण्याची कामें गोऱ्या बाळांना देऊन हमाली कामे करण्याकडे आज त्यांचा उपयोग होत आहे खरा. पण एवढ्यानेच सरकारला आपले कर्तव्य केलें असें

६८