पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/73

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कारखान्याचा अजस्र विस्तार

व्यतिरिक्त बहुतेक मजूर रात्रंदिवस राबत असतात आणि आठ आठ तासांच्या तीन पाळ्या ठरलेल्या आहेत. रोज अदमासाने तीस लाख गॅलन तेल गाळून निघतें ! नेहमीच्या प्रचारांतला टिनचा चौकोनी डबा चार गॅलनचा असतो. असे साडेसात लाख डबे भरून रोज तेल गाळण्याची व्यवस्था आहे ! तेल गाळण्याच्या भट्टया लहानमोठ्या पंचवीस तीस आहेत. त्यांतील अगदी आधुनिक अशी जी आहे, तींतच रोज आठ लक्ष गॅलन तेल तयार होते ! निरनिराळ्या टाक्या तेलाने भरलेल्या असतात. त्यांना जोडणाऱ्या सर्व नळांची लांबी एकत्र केल्यास ती सहज शंभर मैलांहून अधिक भरेल ! कारखान्यांतील मजुरांना जळणासाठी म्हणून तेलच दिले जाते. कारण या मुलखांत सर्पणाची अडचण फार आहे. दरवर्षी सुमारे छत्तीस लाख गॅलन तेल कामगार वर्गातच फुकट वाटले जाते ! इराणी सरकारला स्वामित्वासाठी प्रतिवर्षी सुमारे दहा लाख पौंड म्हणजे दीड कोटि रुपये द्यावे लागतात, यावरून कंपनीला फायदा काय होत असेल याची कल्पना करावी.

 आबादान शहर केवळ अँग्लो-पर्शियन ऑइल कंपनीसाठीच बसविले असल्याचे वर सांगितले आहे. अर्थातच सर्व सुखसोयी कंपनीस कराव्या लागल्या. कोणत्या सुखसोयी येथे आहेत, असे विचारण्यापेक्षा कोणत्या नाहीत असेच विचारणे बरें. पोष्ट, तार, बँक या तर अगदी महत्त्वाच्याच बाबी झाल्या. त्या तेथील सरकारने केल्या तर त्यांत आश्चर्य कसले ? पण कामगारांना रहाण्याची घरे, पाण्याचे नळ, विद्युद्दीप इत्यादि घरगुती गोष्टी देऊन खेळण्यासाठी क्रीडांगण, वाचनालय, रुग्णालय, औषधालय याही सोयी केल्या आहेत. रक्षणासाठी खास व्यवस्था असून गुप्त पोलिस खातेही कंपनीने राखले आहे हे विशेष आश्चर्य होय आणि त्यांतही मौज म्हणजे ही की, प्रस्तुत

६७