पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/70

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

तेलाच्या शुद्धीकरणासाठी पाणी विपुल लागते आणि विलायतेस तें तेल रवाना करण्यासाठी काही तरी सोय करावी लागते. तेव्हा शट-अल-अरब या नदीच्या कांठीं आबादान हे शहर पसंत करण्यांत येऊन या ठिकाणी अत्यंत विस्तृत असा कारखाना बांधण्यात आला. खाणींतून आलेलें दाट तेल तापविले की, त्यांतील गाळ खाली बसतो. पातळ काळसर राहिलेले तेल म्हणजे आपणांकडे मिळणारे क्रूड ऑइल. आगबोटींत किंवा आगगाड्यांत हेच जाळून उष्णता उत्पन्न करतात. तसेच ऑइल एंंजनांतील क्रूड ऑइल वापरण्याचा प्रघात बरेच जणांस विदित असेल. हेच क्रूड ऑईल नाविक ज्वलन ( अॅडमिरल्टी फ्युएल ) म्हणून इंग्रजी बाजारपेठेत ओळखले जाते. या तेलाच्या वरची पायरी म्हणजे नेहमीचे घासलेट तेल; आणि त्याच्याही वरचे पेट्रोल. या मुख्य भांवडांमध्ये आणखी किती तरी प्रकार आहेत. पण मुख्य मुख्य तेवढेच आपणांस पहावयाचे आहेत. खाणींतून आलेले घट्ट तेल उष्ण केलें म्हणजे त्यांतून कांही वायु बाहेर निघतात. त्यांचा उपयोग पेट्रोल करण्याकडे विशेष होतो. ते वायु थंड केले की बेन्झीन म्हणून एक महत्त्वाचे द्रव्य तयार होते. नुसते उष्ण केल्याने शुद्ध घासलेट मिळणे कठीण असते. त्यासाठी त्या घासलेटवर पुष्कळ संस्कार करावे लागतात. एक प्रकारच्या विशिष्ट वाळूंतून ते गाळून काढले म्हणजे अगदी स्वच्छ होऊन त्यांतील साचलेली घाण निघून जाते. पेट्रोलसुद्धा अनेक औषधींच्या सहाय्याने धुवावे लागते व नंतरच ते विक्रीस योग्य होते. ही क्रिया थोडक्यांत लिहून झाली खरी. पण ती घडवून आणणे अतिशय दगदगीचे काम आहे. तेल तापवितांना त्याचे उष्णतामान सारखे ठेवावे लागते. विनाकारण उष्णता फुकट न जाईल अशी व्यवस्था करणे फायदेशीर असते. शिवाय थंड पदार्थांस प्रथम

६४