पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/68

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

हिंदुस्थानांतील प्रत्येक प्रांताचा व प्रत्येक भाषेचा नमुना आबादानमध्ये पहावयास मिळतो. महाराष्ट्राच्या वाट्यास आलेली मंडळी हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच आहेत. याचे कारण आमची घरकोंबडेपणाची वृत्ति असावी. कारखान्याची सर्व व्यवस्था इंग्रज अधि कान्यांच्या हातांत असल्याने आणि सध्या रशियाच्या लाल निशाणास जॉन बुल्ल बुजत असल्याने प्रेक्षकांना प्रवेश मिळणे बहुशः दुरापास्तच होते ! कांही दिवसांपूर्वी रशियन बोल्शेव्हिकांचा उपद्रव येथेही सरू झाल्याचे दृष्टोत्पत्तीस आल्यापासून कामगारांना कामावर जाण्यासाठी परवाने दाखवून आंत जावे लागते. अशा कडक निर्वधामुळे हा कारखाना पहाण्यास मिळेल की नाही याची शंकाच होती. पण श्री. न. चिं. केळकरांचे एक निस्मीम चहाते आणि वाङ्मयप्रेमी महाराष्ट्रीय सद्हस्थ त्या कारखान्यांत मोठ्या हुद्द्याचे जागी असल्याने त्यांच्या खटपटीमुळे कारखाना पहाण्यास परवानगी मिळाली, इतकेच नव्हे तर, दोन अधिकारी बरोबर देऊन फोटो घेण्याचीही खास अनुज्ञा 'केसरी'च्या प्रतिनिधीस मिळाली. ही गोष्ट अगदी अपूर्व अशी असल्याचे तेथील कित्येक अधिकाऱ्यांनी बोलून सुद्धा दाखविलें !

 आपलें नित्योपयोगाचे घासलेट तेल खाणींतून निघते हे आता बहुतेकांस ठाऊक झाले आहे. आबादानपासून दीडशे मैलांवर मसाजदइ-सुलेमान या ठिकाणीं व आसपास तेलाच्या पुष्कळ विहिरी आहेत. पाण्याच्या मोकळ्या व उघड्या विहिरीप्रमाणे या तेलाच्या खाणी खणणे इष्ट नसते. एक तर आंतील तेल जोराने उसळी मारून वर आल्याने आजूबाजूस उडून फुकट जाते आणि दुसरे महत्त्वाचे कारण असे की, आगीची फार भीति असते. तेल ज्वालाग्राही असावयाचेच. पण तेलाबरोबरच अनेक प्रकारचे वायु भूगर्भातून बाहेर पडतात. ते

६२