दोन्ही दाखले मिळवून इराकी अधिकाऱ्यांकडे गेल्यावर त्यांनी इराणांत जाण्यासाठी इराक सरकारची संमति असल्याविना त्या परवान्यास किंमत नाही, म्हणून इराणी वकिलाचा त्यावर शिक्कामोर्तब मिळविला. दोन्ही वेळांस अर्थातच सरकारला ‘ दक्षिणा ' ही द्यावी लागलीच. इतकें होऊनही भागले नाही. मोटारींतून प्रवास करीत असतां, प्रथमतः इराक सरकारचे व नंतर इराणी सरकारचे अधिकारी येऊन त्यांनी सामानसुमान उघडून पाहून पासपोर्टवर आपापल्या सह्या केल्या.
बसऱ्याहून आबादानला जाण्याचे रस्ते दोन; एक, शट-अल-अरब नदीतून होडयांतून जाण्याचा आणि दुसरा, भूमार्गाने मोटारीतून जाण्याचा. दुसरा मार्ग सोयीचा आहे. कारण तो प्रवास त्वरेने आटपतो. परंतु त्रास इतकाच की, दोनदा नदी ओलांडावी लागते. आबादान हे बेट आहे. बसऱ्याहून नदीपार होऊन दुसऱ्या तीरीं आल्यावर मोटारींत बसून मोहोमेऱ्याला जावयाचे होते. सुमारे पंचवीस मैलांचा प्रवास अत्यंत रूक्ष अशा वाळवंटांतून करावा लागतो. मृगजलाने हरिणांची तर फसवणूक होईलच. पण अगदी ज्ञानी मनुष्येही त्या आभासाला भुलतात हे आश्चर्य ! इतके हुबेहुब जलसंचय दृष्टीस पडतात. नदीकडे न पहातां इतर कोणत्याही दिशेला पाहिले तर अगदी सपाट मैदान आढळेल. एक हिरवी गवताची काडी देखील दृष्टिपथांत यावयाची नाही. मग वृक्षराजीची गोष्ट कशाला ? हे रण उन्हाळ्यांत रखरखीत वाटते आणि पावसाळ्यांत नेहमीचा चोखाळलेला रस्ता सोडून दुसरीकडे गेल्यास ‘महापके' निमग्न झालेल्या करतिलकाप्रमाणे अवस्था होते. या चिखलांत उंटच्या उंटे गडप होतात असे सांगतात ! मोहोमेरास आल्यावर पुनः शट-अल-अरब
पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/66
Jump to navigation
Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.
मुसलमानी मुलखांतली मुशाफरी
६०
