पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/62

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी

घ्यावा आणि नको असल्यास तो टाकून चालू लागावे हा प्रकार नेहमीचाच असतो. उष्टें व खरकटें म्हणजे काय याची या प्रांतांतील लोकांस माहितीच नाही. सव्यसाची वीर आपण पुराणांतरीं ऐकतों. भोजनांत इकडे सर्वचजण सव्यसाची असतात, इतकेच नव्हे तर फक्त एकाच हाताने जेवणाराचा दुसरा हात तुटला आहे की काय अशा संशयी मुद्रेने त्याकडे इतर लोक पहातात. मुसलमानी रीतिरिवाजानुसार सर्वांचे भोजन एकाच पात्रांत होते, तेव्हा शुद्धाशुद्धतेची भावना येणार कोठून ?
 सर्वच लोक मांसाहारी आहेत. मंडईतून मेथीची किंवा कोथिंबिरीची जुडी आपण हातांत धरून आणू तसे इकडे मांस हातांतून उघडेंच्या उघडे नेतात. नदीतील मासेही रस्त्यांतून, काकड्या विकतात तशा निर्विकार मनाने विकण्यासाठी येतात. आणि ओला नारळ फोडून विकण्याकरितां ठेवतात. तसेच कोंबडीं, बदकें भाजून उकडून तयार अशी विकणारे घेऊन हिंडतात ! भाजीपाला बहुधा कच्चाच खाण्याची अरबांची रीत आहे. त्यांना मिरचीचा उपयोग लढाईनंतर कळू लागला आणि तोही हिंदी सैन्याने दाखविला तेव्हा ! किती तरी फळे, भाज्या आणि धान्ये ही युद्धोत्तर कालांत अरबी शेतकऱ्यांनी इराकांत लावण्याचा प्रघात पाडला ! दूधदुभते हे उंट, गाढवी, शेळ्या यांचे मिळेल तेवढेच ! तेव्हा लोणी, तूप असे स्निग्ध पदार्थ विपुलतेने त्यांच्या नशिबी कोठून असणार ? चहाचे व्यसन त्यांचे जबर आहे, पण तो चहा बिनदुधाचा असतो आणि तो केव्हा घ्यावयाचा याला कांहीच निर्बध नाही.

 अरबांचे अत्यंत आवडते ठिकाण म्हणजे कॉफीगृह. एखाद्या मोठ्या सभागृहाप्रमाणे विस्तृत असे हे पेयागार माणसांनी सदैव गजबजलेलें

५६