पान:मुसलमानी मुलखांतली मुशाफरी.pdf/61

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

अरबांचा आहार

कशी येणार ? खजुरीच्या बिया अगदी मऊ असून मधांत भिजत घातल्याप्रमाणे दिसतात आणि आंतील बी फारच लहान असते. सर्वांत अधिक खजूर हिंदुस्थानांत व इतरत्र पाठविणारे बंदर म्हणजे बसऱ्याचे आहे. आपल्याकडे द्राक्षांच्या मळ्यांना जसे महत्त्व तसेच इकडील खजुरांच्या शेतांना. भाकरीबरोबर कांदा किंवा तिखट खाण्याचा आपल्या देशांत कुणबी लोकांचा प्रघात असतो, तसाच इकडे खजुराचा उपयोग केला जातो. 'कांदा-भाकर' अथवा भाजी-भाकरी म्हणण्याऐवजी इराकमध्ये 'खजूर-खबूस' असे म्हणतात. नुसत्या खजुरावरही गुजारा करणारे पुष्कळ लोक आहेत.

 अरबांचे भोजन आणि खाद्य पदार्थ–खजुराखेरीज महत्त्वाचें असे पीक इकडे नाहीच. गहू, तांदूळ येथे होतात; पण विशेष नाही. नेहमीचे अरबी खाद्य म्हणजे गव्हाची रोटी. तिला 'खबूस' म्हणतात. कणिक आंबवून भट्टीत भाजून काढलेल्या भाकऱ्या असतात, त्यांला खबूस अशी संज्ञा प्राप्त होते. तिचा आकार साधारणपणे मोठ्या ताटाएवढा असून लहान लहान फुगे वर जमलेले दिसतात. एका बाजूस पांढरे तीळ केव्हा केव्हा लावण्याचा प्रघात आहे. खबूसचा विशेष हा की, त्याच्या बरोबर दुसरें कांही तोडीं लावणे नसले तरी चालते, आणि ही रोटी दहापंधरा दिवस सहज टिकते. आंबवून केल्याने ती पचनास हलकी असते, बाजारांत हे खबूस विकत घेतांना गिऱ्हाइकाच्या मनांतच किती वेळ घोळ पडतो. कारण आपल्याकडे वर्तमानपत्र विकत घेण्यापूर्वी एखादा फुकट्या वाचक जसा सर्व उघडून महत्त्वाच्या बातम्या वाचून नंतर पूर्ववत् घडी करून ते विकणाऱ्या पोरास परत करतो, तसेच सर्व गिऱ्हाइकांचे चालते. वाटेल त्याने यावे, पसरून ठेवलेल्या खबूसांना उचलावे, हात फिरवून पहावा, वास

५५